नायब तहसीलदार अस्मा मुजावर यांची धाड फेल! ३२ अधिकारी, कर्मचाऱ्यांसह साखरखेर्डा येथील एका घरात धडकल्या, पण हाती काही लागले नाही...

 
साखरखेर्डा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) १५ जुलै रोजी निवासी नायब तहसीलदार अस्मा मुजावर यांनी साखरखेर्डा येथील एका शेतकऱ्याच्या घरात छापा टाकला. सुरुवातीला शेतकरी घरी नसल्याने त्यांचे कुटुंबाने अधिकाऱ्यांना घरात येण्यास मज्जाव केला होता. परंतु, छापा टाकला असता काहीही मिळून आले नाही. याउप्पर कुठलेही सर्च वॉरंट नसताना प्रशासकीय अधिकारी अचानक घरात कसे घुसले ? असा सवाल मनस्ताप झालेल्या शेतकऱ्याने उपस्थित केला होता. 
सोमवारी, संध्याकाळी नायब तहसीलदार अस्मा मुजावर ह्या पोलीस बंदोबस्तात येथील रमेश तुपकर यांच्या घरी धडकले. घरात रेशनचा अवैध साठा असल्याचे कारण दाखवून हा छापा टाकण्यात आला असे बोलले जात होते. ज्यावेळी नायब तहसीलदार मुजावर या अधिकाऱ्यांसह घरात शिरत होत्या, तेव्हा मधुमती तुपकर आणि त्यांच्या मुलीने घरात येण्यास मज्जाव केला. दरम्यान, रमेश तुपकर, सुरेश तुपकर हे घरी आले. याप्रकरणी सर्च वॉरंट आहे का? असे अधिकाऱ्यांना विचारले. त्यांनतर तहसीलदार मुजावर यांनी एक लेखी पत्र त्यांना लिहून दिले. 
     ठाणेदार, अन्नपुरवठा अधिकारी, तलाठी, अशा अधिकाऱ्यांसह त्या घरात शिरल्या. घरात झडती घेण्यात आली, यामध्ये २८० सोयाबीनचे पोते दिसून आले. शिवाय, अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार कुठल्याही प्रकारचा अवैध रेशनचा साठा आढळला नाही. या छाप्यातून नेमके काय साध्य करायचे होते ? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. एकंदरीत, तहसीलदार अस्मा मुजावर यांनी टाकलेली धाड (छापा) फेल गेली व शेतकऱ्याला विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला अशी चर्चा सुरू झाली आहे.