सौ. वैशाली राजपूत यांना राज्यस्तरीय संजीवनी पुरस्कार घोषित! कारण आहे खास; ५ एप्रिलला होणार वितरण
बुलडाणा(लाइव्ह ग्रुप नेटवर्क) : मागील दोन दशकांपासून एच आय व्ही - एड्स या क्षेत्रामध्ये भरीव काम करणाऱ्या सौ. वैशाली रणजीतसिंग राजपूत यांना राज्यस्तरीय संजीवनी पुरस्कार घोषित झाला आहे. ५ एप्रिल २०२३ रोजी सदर पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे.
संजीवनी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक संस्था केळवद यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रामध्ये समर्पित भावनेने काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना राज्यस्तरीय संजीवनी पुरस्कार दिला जातो. सौ वैशाली राजपूत मागील २० वर्षांपेक्षा अधिक काळापासून एचआयव्ही संसर्गित पुरुष, महिला, बालक यांच्या पुनर्वसनासाठी सक्रिय कार्य करीत आहेत. एम.एस.डब्ल्यू. शैक्षणिक पदवी प्राप्त असलेल्या वैशालीताई सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील ए.आर.टी. सेंटरमध्ये जिल्हा समुपदेशिका म्हणून कार्यरत आहेत. अनेक एचआयव्ही संसर्गितांना त्यांनी आत्महत्येपासून परावृत्त केलेले असून आपल्या समुपदेशनाद्वारे त्यांनी अनेकांना जगण्याची प्रेरणा दिली आहे. संजीवनी बहुउद्देशीय संस्थेकडून ५ एप्रिल २०२३ रोजी केळवद याठिकाणी सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सोहळ्यात सौ. वैशाली राजपूत यांना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय संजीवनी पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे. पुरस्कार घोषित झाल्यापासून वैशालीताईंचे समाजातील विविध स्तरांमधून अभिनंदन होत आहे.