आमदार श्वेताताईंनी घेतली शेतकऱ्यांची बाजू; भक्तीमार्गाला विरोध;जमिनी अधिग्रहण थांबवून भक्तीमार्ग रद्द करा!मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

 

चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेड राजा ते संतनगरी शेगाव यांना जोडणारा व जिल्ह्यातील सिंदखेडराजा देऊळगाव राजा चिखली खामगाव व शेगाव तालुक्यातून जाणाऱ्या भक्ती महामार्गाबद्दल या पाचही तालुक्यामधील शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. या जनभावनेची दखल घेऊन आमदार श्वेता ताई महाले यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवून या पत्राद्वारे सदर भक्ती महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या अधिग्रहित केलेल्या जमिनी परत देण्याची व हा मार्ग रद्द करण्याची मागणी केली आहे. दिनांक २० मार्च २०२४ रोजी आमदार महाले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे पत्र सादर करून जिल्ह्यातीलशेतकऱ्यांच्या मागणीचा पाठपुरावा केला आहे. 

जिल्ह्यातील सिंदखेडराजा ते शेगाव या भक्ती महामार्गासाठी मागील वर्षीच्या अर्थ संकल्पात घोषणा झालेली होती. सदर भक्ती मार्ग सिंदखेडराजा, देऊळगावराजा, चिखली, खामगाव, शेगाव या तालुक्यातील ४३ गावांतून जात असून या सर्व गावात शेतकऱ्यांची सुपीक व कसदार जमीन अधिग्रहीत करण्यात येत आहे. अधिसूचना देखील प्रसिध्द झालेली आहे. या अधिग्रहण सुचनेमुळे शेतकरी वर्गात प्रचंड असंतोष आहे. प्रस्तावित भक्ती महामार्गामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात भूमिहीन होणार आहेत. सदर ४३ गावांतील शेतकऱ्यांचा या भक्ती मार्गाला विरोध आहे तसेच ग्राम पंचायतींनी ठराव तयार करून जिल्हाधिकारी, बुलडाणा यांचेमार्फत आपणाकडे सादर केलेला आहे. करीता, शेतकऱ्यांचा असंतोष पहाता सदर भक्ती महामार्गासाठी ४३ गावातील शेतकऱ्यांच्या शेत जमीनी संपादित करण्यात येऊ नये, व प्रस्तावित शेगाव ते सिंदखेड राजा हा भक्ती महामार्ग रद्द करण्यात यावा, अशी विनंती आ. श्वेताताई महाले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या पत्रातून केली आहे.
वास्तविक भक्तिमहामार्गाबद्दल शेतकऱ्यांच्या असलेल्या तक्रारींची जाणीव आ. श्वेताताई महाले यांना सुरुवातीपासूनच होती. एक संवेदनशी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी दि. २० मार्च २०२४ रोजीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा अजितदादा पवार यांना पत्राद्वारे शेतकऱ्यांच्या अधिग्रहित केलेल्या जमिनी परत करून हा महामार्ग रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चिखली तालुक्यातील पळसखेड दौलत येथे खा. प्रतापराव जाधव यांच्या प्रचार दौऱ्यानिमित्त आ. श्वेताताई महाले ह्या गेल्या असता शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने आ. महाले यांची भेट घेऊन त्यांना हा महामार्ग रद्द करण्याबाबत मागणी केली होती. त्यावेळी आ. श्वेताताई महाले यांच्या मागणीशी आपण सहमत असून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून हा महामार्ग रद्द करावा व शेतकऱ्यांच्या अधिग्रहित केलेल्या जमिनी परत कराव्या अशी मागणी केल्याची माहिती आ. महाले यांनी तेव्हा जाहीर सभेत दिली होती. परंतु, त्या काळात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे त्या पत्राला बातमीच्या स्वरूपात प्रसिद्धी देणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे आता या संदर्भातली माहिती आ. श्वेताताई महाले यांच्याकडून जाहीर करण्यात आली आहे. 
पावसाळी अधिवेशनात मुद्दा उचलून धरणार...
भक्ती महामार्ग रद्द करण्याबाबत केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करूनच आ. श्वेताताई महाले थांबणार नसून लवकरच सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देखील हा मुद्दा आपण उचलणार असल्याची माहिती आ. श्वेताताई महाले यांनी दिली आहे..चिखलीसह बुलढाणा जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेता राज्य सरकारने हा महामार्ग रद्द करावा व शेतकऱ्यांच्या अधिकृत केलेल्या जमिनी तातडीने परत कराव्या अशी मागणी आपण सभागृहात जोरदारपणे मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.