गोरगरीबांची सेवा करण्यासाठी पंतप्रधानांना दीर्घायुष्य लाभाे -आमदार श्वेताताई महाले

 
file photo
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याला अडवून घातपात करण्याचा प्रयत्न परवा पंजाबमध्ये झाला. या घटनेचे राजकारण करणे ही निंदनीय बाब असून, आपण या गोष्टीचा निषेध करतो आणि देशातील गोरगरीबांची सेवा करण्यासाठी पंतप्रधानांना दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना करते, अशी प्रतिक्रिया आमदार श्वेताताई महाले यांनी व्यक्त केली. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ७ जानेवारी रोजी सिध्द सायंस मंदिरातील शिवलिंगास दुग्धाभिषेक आणि महामृत्यूंजय जप केला. त्‍यावेळी त्या बोलत होत्या.

देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेत जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करून त्यांना दगाफटका करण्याचे कारस्थान यामागे होते, असा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवलिंगास दुग्धाभिषेक करून महामृत्यूंजय जप आणि पंतप्रधानांवरील संकट दूर होऊन त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना करण्यात आली.

आमदार सौ. महाले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमाला प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. विजय कोठारी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह राजपूत, पंचायत समितीच्या सभापती सिंधूताई तायडे, सदस्य शमशाद पटेल, शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, माजी शहराध्यक्ष सुरेंद्र पांडे, नगरसेवक गोविंद देव्हडे, विजय नकवाल, सुभाषअप्पा झगडे प्रामुख्याने उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष सुहास शेटे यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपा सोशल मीडिया विभाग सहसंयोजक रेणुकादास मुळे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सागर पुरोहित, भाजपा शहर सरचिटणीस सचिन कोकाटे, महेश लोणकर, घनश्याम बंग, विजय वाळेकर, अक्षय भालेराव, सतीश मोरवाल, अरुण सोनवणे, हरीभाऊ परिहार आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.