आमदार असावा असा...शेतकऱ्यांनी नुकसानीची कहानी ऐकवताच आमदार सौ. महाले यांनी मंत्र्यांची घेतली भेट!; त्वरित पंचनामे करून निकषानुसार प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश!!

 
श्वेताताई महाले
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा जिल्ह्यात विशेषतः चिखली आणि बुलडाणा तालुक्‍यात आज, २८ डिसेंबरला झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, ज्वारी, कांदा आणि यावर्षी नव्यानेच प्रयोग करण्यात आलेल्या उन्हाळी सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले आहे. सध्या हिवाळी अधिवेशनासाठी मुंबईत असलेल्या चिखलीच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांना शेतकऱ्यांनी संपर्क करून नुकसानीची माहिती दिली. त्‍यानंतर सौ. महाले पाटील यांनी कर्तव्यतत्पर आमदार कसा असतो याची प्रचिती आणून देत तातडीने मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची सभागृहातच भेट घेतली आणि निवेदन दिले. त्यावर तातडीने कार्यवाही करत वडेट्टीवार यांनी बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करून निकषानुसार प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे, की आज २८ डिसेंबरला सायंकाळी पश्चिम विदर्भ, विशेषतः बुलडाणा जिल्ह्यात तुफान गारपीट आणि वादळी पाऊस झाला. अचानक आलेल्या नैसर्गिक संकटाने शेतकरी हादरून गेला असून, पिकांच्या मोठ्या नुकसानीला त्याला सामोरे जावे लागले आहे. अगोदरच अतिवृष्टी व नापिकीने शेतकरी त्रस्त आहे.

राज्य शासनाने शेतकऱ्यांना कोणतीही मदत दिलेली नाही. चिखली तालुक्यात खरीप हंगामात प्रचंड नुकसान होऊनही कोणतीही मदत राज्य शासनाने दिलेली नाही. जून महिन्यातील झालेल्या ढगफुटीची देखील मदत दिलेली नाही. परतीच्या पावसाने नुकसान झाल्यावर देखील राज्य शासनाने तर कोणतीच मदत दिली नाही. त्याचप्रमाणे पीक विमा कंपनीने सुद्धा अद्याप नुकसान भरपाई दिलेली नाही.  त्यातच आज झालेल्या गारपीट व वादळी पावसाने तो चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदतीचा दिलासा देण्याची मागणी आ. सौ. महाले पाटील यांनी केली. मंत्री वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून निकषानुसार प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. त्‍यामुळे शेतकऱ्यांत आशेचा किरण निर्माण झाला आहे.