आमदार डॉ. शिंगणेनी घेतली महत्वाची बैठक! अधिकाऱ्यांना धारेवर धरले; आता १५ दिवसांच्या आत सिंदखेडराजा, देऊळगावराजा, लोणार आणि चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीक विम्याचे पैसे;

बैठकीतुनच लावला कृषी मंत्री धनंजय मुंडेंना फोन....

 
Shingne
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज एक महत्त्वाचा विषय मार्गी लावला. सिंदखेडराजा, देऊळगावराजा, चिखली आणि लोणार तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना पात्र असूनही पीक विम्याची रक्कम मिळाली नव्हती. २०२३ -२४ खरीप हंगामात नुकसान झालेले ७४१९ आणि याच २०२३-२४ च्या रब्बी हंगामात नुकसान झालेले १७३६८ शेतकरी पिक विम्याच्या नुकसान भरपाई पासून प्रलंबित होते. आता अखेर या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार आहे. १५ दिवसांच्या आत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यासाठी आ. डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज जिल्हा कृषी अधीक्षक व पिक विमा कंपनीचे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत डॉ.शिंगणे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. बैठकीतूनच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना फोन लावून त्यांच्या कानावरही हा विषय टाकला, अखेर १५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्याचे आश्वासन पिक विमा कंपनीचे अधिकाऱ्यांनी डॉ.शिंगणे यांना दिले.
  सिंदखेडराजा, देऊळगावराजा, लोणार आणि चिखली या तालुक्यातील ४३ हजार ५०५ शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी आतापर्यंत २३४१.५ कोटींची पीक विम्याची रक्कम देण्यात आली आहे. ७४१९ शेतकरी खरीप हंगामाच्या पीक विम्याच्या नुकसान भरपाई पासून वंचित आहेत. तर रब्बी हंगामाच्या नुकसान भरपाईपासून १७ हजार ३६८ शेतकरी वंचित आहेत. या शेतकऱ्यांच्या खात्यात १५ दिवसांच्या आत रक्कम जमा करण्याचा शब्द पीक विमा कंपनीने आ. डॉ.राजेंद्र शिंगणे यांना दिला आहे. खरीप हंगामाच्या नुकसानीपोटी ७४१९ शेतकऱ्यांना १६०.४७ कोटी तर रब्बी हंगामातील नुकसानीपोटी १७३६८ शेतकऱ्यांच्या खात्यात ३९०९.९ कोटी रुपये जमा होणार आहेत.