Amazon Ad

गडबड घोटाळा! आतेबहिणीचा इश्क त्याच्या डोळ्यात खुपला मग त्याने जे केले ते धक्कादायक; चिखली तालुक्यातील वळतीचा आहे प्रियकर! कारणामे करणारा मामेभाऊ माळवंडीचा..

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): इंस्टाग्राम आणि व्हॉटस्अपचा वापर करून मामेभावाने आतेबहिणीची इज्जत धोक्यात आणली. आतेबहिणीचे प्रेमप्रकरण त्याच्या डोळ्यात खुपत होते,म्हणून तिचे आणि तिच्या प्रियकरासोबत असलेले फोटो त्याने चारचौघात व्हायरल करून बदनामी केली. सायबर पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.
 

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर तरुणी चिखली तालुक्यातील एका गावची आहे. तिच्या मामाचे गाव माळवंडी आहे. तरुणी एका निवासी शाळेत शिक्षण घेते. चिखली तालुक्यातील वळती येथील सागर हरिसिंग शिंगणे या तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे दोघांनी एकमेकांसोबत घालवलेल्या काही क्षणांचे फोटो सागरच्या मोबाईल मध्ये होते. तरुणीच्या प्रेमसंबंधाबद्दल तिच्या माळवंडी येथील मामेभावाला कल्पना होती. त्यामुळे सागर आणि त्याच्या आतेबहिणीचे फोटो मिळवण्याचा चंग मामेभावाने बांधला.
  
तिला विश्वासात घेतले अन्..

दरम्यान माळवंडीच्या त्या मामेभावाने  आतेबहिणीला विश्वासात घेतले. तिच्या इंस्टाग्राम खात्याचा पासवर्ड त्याने मिळवला. त्यानंतर त्यावरून त्याने सागर सोबत चॅटिंग केली. सागरला वाटले की त्याची प्रेयसी आहे मात्र तो तिचा मामेभाऊ होता. त्याने सागरला "त्या" फोटोंची मागणी केली. सागरने देखील त्याचे अन् तिचे फोटो त्याला पाठवून दिले. अन् तिथून पुढे तरुणीच्या मामेभावाने सगळा प्लॅन रचला..!

मित्रांकडून जुने सिमकार्ड घेतले अन् त्यावरून..

दरम्यान हे सगळं झाल्यावर तरुणीच्या मामेभावाने गावातीलच त्याचा एक मित्र शाहरुखशहा गुलजारशहा याच्याकडून एक सिमकार्ड घेतले. त्यावर व्हॉटस् अप सुरू केले. आणि त्या सिमकार्ड वरील नंबर वरून तरुणीचे वळतीच्या सागर सोबत काढलेले फोटो  तरुणीच्या नातेवाईकांना , तिच्या आईवडिलांना पाठवले.सोशल मीडियावर बदनामी कारक फोटो व्हायरल झाल्याने तरुणीला मोठा धक्का बसला. सायबर पोलीस ठाण्यात याची तक्रार देण्यात आली. पोलिसांनी तातडीने पावले उचलत  तरुणीचा माळवंडी येथील मामेभाऊ, सिमकार्ड देणारा त्याचा मित्र शाहरुखशहा गुलजारशहा आणि तरुणीचा वळती येथील प्रियक्रार सागर शिंगणे या तिघांना अटक केली आहे. सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सारंग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापोनि सुनील सोळुंके, पोलीस अंमलदार ज्ञानेश नागरे, पवन मखमले, विकी खरात, पंढरी सातपुते, दिपक जाधव, आनंद हिवाळे, शोएब अहमद यांनी हा तपास केला.