मेहकरात सावकारकीने घेतला बळी! प्लॉट घेण्यासाठी व्याजाने पैसे घेतले होते...नंतर जे घडल ते धक्कादायक !
मेहकर(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सावकारकीतून व्याजाने पैसे घेणे एका महिलेच्या जीवावर बेतले. प्लॉट घेण्यासाठी तिने व्याजाने पैसे घेतले होते, मात्र पैसे व्याजाने देणाऱ्यांनी तिच्याकडे असा तगादा लावला की त्या त्रासाला कंटाळून महिलेने गळफास घेतला. मेहकर पोलिस ठाण्यात मृतक विवाहितेच्या पतीने याप्रकरणाची तक्रार दिली आहे.
बाना फिरोज शेख(३७ रा. माळीपेठ) असे मृतक विवाहितेचे नाव आहे. पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मृतक शबाना हिने प्लॉट घेण्यासाठी व्याजाने पैसे घेतले होते. मात्र काही कारणामुळे ती पैशाचा वेळेवर परतावा देऊ शकली नाही. त्यामुळे आरोपीनी विवाहितेच्या घरात जाऊन तिला वेळोवेळी धमक्या दिल्या, फोनवर तगादा लावला. यामुळे मानसिक तणावात येऊन शबाना हिने राहत्या घरी गळफास घेतला. ही बाब विवाहितेच्या पतीला कळताच तातडीने मेहकर शहरातील गाभणे हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी हलविण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान शबाना चा मृत्यू झाला.
शबाना ला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे तिच्या पतीने तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून शबाना शेख रशीद शेख( जानेफळ वेस, मेहकर), साधना गजानन नटाळ (माळीपेठ ,मेहकर), बाबा खान जफर खान( बागवानपुरा मेहकर) व रोहन शिंदे( रामनगर ,मेहकर) अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.