उन्हाळी हंगामात मेहकर आगाराची बक्कळ कमाई! विदर्भात पटकावला दुसरा क्रमांक; वाचा किती केली कमाई..

 
dfj

मेहकर (अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मार्च ते मे या उन्हाळी हंगामातील तीन महिन्यात तब्बल १४ कोटी ३५ लाख रुपये उत्पन्न आणि ९९ टक्के प्रवाशी भारमान मिळवत एस टी महामंडळाच्या मेहकर आगाराने विदर्भात दुसरा क्रमांक मिळविला आहे.

मार्च महिन्यात लग्नसराई आणि परिक्षा यामुळे एसटीच्या गर्दीच्या हंगामाला सुरुवात होते. या महिन्यात मेहकर आगाराच्या बसेस ७ लाख ८ हजार किलोमीटर धावल्या आणि ९६ टक्के भारमान ४ कोटी ३६ लाख रुपये उत्पन्न मिळविले. ४७ लाख १५ हजार नफा मिळाला.

एप्रिल महिन्यात ७ लाख ४४ किमी, ४ कोटी ८४ लाख उत्पन्न आणि १०३ टक्के प्रवाशी भारमान प्राप्त करत आगाराने ७२ लाख ८३ हजार रुपये नफा मिळविला आहे. मे महिन्यात प्रवाशी गर्दीत अधिक वाढ होऊन ५ कोटी १४ लाख उत्पन्न ९४ टक्के भारमान आणि ४८ लाख ४६ हजार नफा प्राप्त झाला. मेहकर आगारात ९० बसगाड्या आणि ४५० कर्मचारी आहेत. मार्च ते मे पर्यंत तीन महिन्यात १४ कोटी ३५ लाख उत्पन्न मिळवून आगार विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

जुन्या बसगाडयांची मोठी संख्या, दीर्घकाळ नवीन बसेस उपलब्ध झालेल्या नाहीत, तरीही आगाराने मोठे यश प्राप्त केले आहे विभाग नियंत्रक अशोककुमार वाडीभस्मे, यंत्र अभियंता अमोल  गाडबैल, विभागीय वाहतूक अधिकारी मस्कर यांचे सततचे मार्गदर्शन आणि चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी यांनी घेतलेले परिश्रम यामुळे हे यश मिळाल्याचे आगार व्यवस्थापक संतोष जोगदंडे यांनी सांगितले सहायक वाहतूक अधीक्षक पवार, कार्यशाळा अधीक्षक राहुल देशमाने, वाहतूक निरीक्षक वानखेडे यांचेही भरीव सहकार्य लाभल्याचे ते म्हणाले.