मार्केटिंग फेडरेशनकडून मूग, उडीद, सोयाबीनची खरेदी सुरू

 
File Photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत हंगाम 2021-22 करिता मूग 7275 रुपये, उडीद 6300 हजार रुपये व सोयाबीन 3950 रुपये प्रति क्विंटल हमीदराने "नाफेड'मार्फत शेतकऱ्यांच्या मूग, उडीद व सोयाबीनची खरेदी सुरू करण्यात आली आहे. या खरेदीची अंतिम मुदत 25 जानेवारी 2022 असणार आहे.
 
शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरूच राहणार आहे. या खरेदीसाठी मार्केटिंग फेडरेशनच्यावतीने जिल्ह्यात 10 केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. यात तालुका शेतकी सहकारी खरेदी-विक्री समिती मर्या. देऊळगाव राजा, लोणार, मेहकर, शेगाव, संग्रामपूर, बुलडाणा तसेच मोताळा येथे संत गजानन कृषी उत्पादक कंपनी व साखरखेर्डा (ता. सिंदखेड राजा) येथे सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी, स्वराज्य शेतीपूरक सहकारी संस्था मर्या. चिखली केंद्र उंद्री (ता. चिखली), माँ जिजाऊ फार्मर प्रोड्युसर कंपनी नारायणखेड केंद्र सिंदखेड राजा यांचा समावेश आहे. या केंद्रामध्ये मूग, उडीद व सोयाबीन खरेदी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्‍या शेतकऱ्यांना खरेदीसाठी एसएमएस येतील, त्यांनी या संस्थांकडे आपला माल विक्रीसाठी घेऊन यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.