मराठी गौरव दिनानिमित्ताने मराठी काव्यसंध्या! एैसी अक्षरे रसीकत्वे मिळविणाऱ्या मराठीचे बोल कौतुकाचेच- प्रा.देशमुख यांचे प्रतिपादन

वि.वि.शिरवाडकर उपाख्य कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनी साजऱ्या होणाऱ्या मराठी गौरव दिन निमित्त आज सोमवार २७ फेब्रुवारी रोजी डॉ.गायकवाड हॉस्पीटलच्या सांस्कृतिक सभागृहात ‘काव्यसंध्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी प्रा.डॉ.सदानंद देशमुख बोलत होते. यावेळी गझलकार डॉ.गणेश गायकवाड, समाजसेविका शाहीनाताई पठाण व विजयाताई काकडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरंच धन्य एैकतो मराठी..’ या कवितेनं काव्यसंध्येचा आरंभ झाला. हभप सुरेश चव्हाण यांनी कवितेतला अध्यात्मभाव मांडला. त्यानंतर ‘केले सर्वांगी तुला अर्पण, झुरले रे विरहाने माझे मन’ ही विरहावरील कविता व त्यानंतर ‘बा पावसा’ ही कविता डॉ.माधुरी चाटे यांनी सादर केल्या.
डॉ.वैशाली निकम यांनी ‘शृंगार मराठीचा’ ही सौंदर्यरसाने ओतप्रत भरलेली कविता सादर केली. डॉ.साधना भवटे यांनी ‘जगावेगळा अबोला जगावेगळा राग, चिरकुटलेल्या गोष्टींवरती ओतती आग..’ या स्त्री-पुरुष संबंधाच्या इंग्रजी कवितेचा मराठी अनुवाद सादर केला. ‘तिला थांबणे जमले नाही, त्याला सांगणे जमले नाही’.. यासह ‘राजसा एकदा वळून पहा रे..’ ही रामायणातल्या उर्मीलेवरची कविताही साधनाताईची भावविश्व रेखाटून सादर केली. डॉ.माधवी जवरे यांनी कविवर्य कुसुमाग्रज यांची कविता सादर केली.
अमरचंद कोठारी यांनी मुलीवरची बालकविता तर सुधाकर मानवतकर यांनी बापावरची कविता सादर केली. डॉ.गणेश गायकवाड यांनी मराठी व हिंदी गझल सादर केली. विजय बावस्कर यांच्यासह डॉ.गजेंद्र निकम ‘गे माय भू तुझे मी-फेडीन पांग सारे, आणिन आरतीला हे सूर्य-चंद्र-तारे’ ही कविता सादर केली. विशाल मोहीते याने ‘शाप’ ही हृदयास्पर्शी मराठी गझल सादर केली. काव्यसंध्येचे सुत्रसंचालन पत्रकार राजेंद्र काळे यांनी केले. सव्वातास ‘काव्यसंध्या’ उस्फूर्तपणे बहरत गेली.
मराठी गझलकार विशाल मोहिते यांचा सत्कार..
सकस गझल लेखन करण्यासह प्रभावशाली सादरीकरणातून रसिकांची उस्फूर्तपणे दाद घेणारे विशाल मोहिते यांना ‘लक्ष्मण जेवणे गझल अंकुर पुरस्कार २०२३’ जाहीर झाल्याबद्दल विशाल मोहिते यांचा या ‘काव्यसंध्या’ कार्य्रकमात प्रा.डॉ.सदानंद देशमुख यांच्यासह सर्व उपस्थितांचे हस्ते त्यांचा सत्कार मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने करण्यात आला.