माँ जिजाऊ, संत चोखामेळा जन्मोत्सव ५० व्यक्तींच्याच उपस्थितीत होणार!

 
jijau
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाचे जिल्ह्यात तब्‍बल २३ बाधित आढळल्यानंतर प्रशासनाने अधिक गांभीर्याने घेत पुढे हाेणारे सर्व उत्‍सव मर्यादित स्वरुपात पार पडतील याची काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. शासनाच्या निर्देशानुसार सर्व सामाजिक, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व मोठ्या प्रमाणावर गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांना उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या ५० व्यक्तींपुरती मर्यादीत ठेवण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी होणारे कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात १२ जानेवारीला साजरा होणारा माँ जिजाऊ जन्मोत्सव व १४ जानेवारीला असणारा संत चोखामेळा जन्मोत्सव सोहळ्याला साध्या पद्धतीने ५० व्यक्तींच्या उपस्थितीत साजरा करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

sant chokhamela

जिजाऊ जन्मोत्सवात १२ जानेवारी राजे लखुजीराव जाधव राजवाडा येथील महापूजा, जिजाऊ सृष्टी येथे शिवधर्म ध्वजारोहण, जिजाऊ सृष्टी येथे शाहिरांचे पोवाडे, मुख्य जन्मोत्सव सोहळा, समारोपीय कार्यक्रम तसेच संत चोखामेळा जन्मोत्सव सोहळ्यातील कार्यक्रम ५० व्यक्तींच्या उपस्थितीत घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.  

सोहळ्यासाठी उपस्थितांना मास्क वापरणे बंधनकारक राहणार आहे. कार्यक्रम स्थळी येणाऱ्या व्यक्तींकडे ४८ तासांपूर्वी आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह अहवाल प्रमाणपत्र सोबत असावेत. जिजाऊ जन्मोत्सव कार्यक्रमासाठी उपस्थित व्यक्तींना आयोजन समितीकडून ओळखपत्र देण्यात यावे. जन्मोत्सवा दरम्यान होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या प्रत्येक ठिकाणी ओळखपत्र हे स्वतंत्र असावेत. ओळखपत्राशिवाय कोणत्याही कार्यक्रम स्थळी प्रवेश देऊ नये.

जिजाऊ जन्मोत्सव दरम्यान सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी हात धुण्यासाठी पाण्याची पुरेशी व्यवस्था असावी. जिजाऊ जन्मोत्सवासाठी व्यक्ती, आयोजक, निमंत्रीत, सदस्य, सहाय्यक सेवेकरी, खासगी सुरक्षा रक्षक व बंदोबस्तावरील लोक यांच्यासह कोणत्याही परिस्थितीत गर्दी, जमाव संख्या ५० पेक्षा जास्त होणार नाही याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. कार्यक्रमासाठी उपस्थित व्यक्तींनी कोविड १९ प्रतिबंधात्मक दोन लस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे.

उत्सवादरम्यान कोरोना या विषाणूच्या प्रसारावर प्रतिबंध घालण्यासाठी गर्दी न करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्क न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंड करणे याबाबतची कारवाई नगर पालिका व पोलीस विभाग करणार आहेत, असे अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.