केवळ चार टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध!; या बुलडाण्यात!!

जिल्हा उद्योग केंद्राची कर्ज योजना
 
money
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा उद्योग केंद्रामार्फत केवळ चार टक्के व्याज दराने सॉफ्ट लॉन उपलब्ध आहे. या सॉफ्ट कर्ज योजनेसाठी शिक्षणाची व वयाची अट नाही. मात्र संबंधित उद्योग करण्यासाठी आवश्यक कौशल्य वा अनुभव असणे आवश्यक आहे. यात वंश परंपरागत व्यवसाय असणाऱ्या अर्जदारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

योजनेच्या माध्यमातून एक लाख लोकसंख्या (२०११च्या जनगणनेनुसार) असणाऱ्या गावात नवीन उद्योग सुरू करता येणार आहे. या उद्योगामध्ये  फक्त लघु आणि सेवा उद्योगांचा समावेश राहणार आहे. या उद्योग प्रकल्पाचा जास्तीत जास्त खर्च दोन लाखांपर्यंत असणार आहे.

या उद्योगाला बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्पाच्या २० टक्के अथवा ४० हजारांपर्यंत व अनुसूचित जाती- जमाती प्रवर्गासाठी ३० टक्के अथवा ६० हजारांपर्यंत चार टक्के व्याजदराने देय राहणार आहे. अधिक माहितीसाठी  जिल्हा उद्योग केंद्र, मलकापूर रोड, बुलडाणा येथे संपर्क साधावा. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पध्दतीने सॉफ्ट लोन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुक व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे...
विहित नमुन्यातील दोन प्रतीत अर्ज, लघु उद्योगाची नोंदणी, जागा मालकाचे संमतीपत्र किंवा जागेचा भडेपट्टा किंवा टॅक्स पावती, ग्रामपंचायत अथवा नगर पालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र, यंत्रसामग्री अथवा फर्निचरचे दरपत्रक, जर बांधकाम करावयाचे असल्यास बांधकामाचे अंदाजपत्रक, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गाचा अर्जदार असल्यास जातीचे प्रमाणपत्र असावे.