शेळ्यांच्या गोठ्यावर वीज कोसळली ; पाच शेळ्या ठार ! महिला थोडक्यात बचावली.. मेहकर तालुक्यातील अंबाशी येथील घटना..
Jun 24, 2024, 09:26 IST
मेहकर (अनिल मंजुळकर: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) पेरणीनंतर रुसवा धरून बसलेल्या पावसाने काल अचानक रौद्ररूप धारण केले. जिल्ह्यात विविध ठिकाणी विजेच्या कडकटासह जोरदार पाऊस बरसला. मेहकर तालुक्यातील आंबाशी येथे गोठ्यावर वीज कोसळल्याने पाच शेळ्या ठार झाल्याची घटना काल २३ जूनच्या सायंकाळी घडली. दरम्यान, शेळ्यांना बांधण्यासाठी गेलेली महिला सुदैवाने बचावली.
प्राप्त माहितीनुसार, मेहकर तालुक्यातील हिवराखुर्द गावापासून दोन किलोमीटर अंतरावर अंबाशी हे गावं आहे. येथील कमलाबाई जाधव यांच्या घराला लागून एका गोठ्याची बांधणी करण्यात आली आहे. यामध्ये शेळ्या,आणि गुरे ठेवण्यात येतात. याच गोठ्यावर सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वीज कोसळली. तेव्हा त्यांची सून मिरा जाधव ह्या देखील तिथेच होत्या. शेळ्यांसह त्यांना देखील विजेचा धक्का बसला. गोठ्यातील पाचही शेळ्या विजेच्या जोरदार धक्क्याने दगावल्या तर मीरा जाधव या गंभीर जखमी झाल्या होत्या. या घटनेनंतर, परिसरातील लोकांनी मीरा जाधव यांना तात्काळ जानेफळ येथील रुग्णालयात भरती केले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून मीरा जाधव यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.