चांगला पाऊस पडू द्या, पुरेशी ओल झाल्यानंतरच पेरणी करा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांचे बळीराजाला कळकळीचे आवाहन!

 
बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : अल्पशा पावसाच्या आधारावरच शेतकरी पेरणी करत असल्याने बियाणे उगवत नाही. उगवले तर काही दिवसांतच करपते. त्यामुळे खते, बी-बियाणे आणि पेरणीवर केलेला खर्च वाया जातो. परिणामी दुबार पेरणीला सामोरे जावून शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडतात. त्यासाठी चांगला पाऊस पडू द्या, जमिनीत पुरेशी ओल असल्याची खात्री झाल्याशिवाय पेरणी करू नका, असे कळकळीचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला जोमाने लागले आहेत. शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आला आहे. त्याचप्रमाणे पेरणीच्या दृष्टीने खते, बी-बियाणांची खरेदी करण्यासाठी कास्तकारांनी जुळवाजुळव सुरू केली आहे. मृग नक्षत्र आता महिनाभरावर आले आहे. मृग नक्षत्रात हमखास पाऊस पडतो, असा विश्वास शेतकऱ्यांना असल्याने त्या काळात पेरणी आटोपती घेण्यासाठी शेतकरी तयारी करून ठेवतात. सध्या त्या तयारीतच बळीराजा गुंतला आहे.
शेतजमिनीची ओल चार ते सहा इंच किंवा शंभर मिमी पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी कोणत्याही बियाणांची पेरणी करू नये. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा नसताना पेरणीची घाई केल्यास जमिनीतील उष्णतेमुळे पेरलेले बियाणांचे अंकुरण होत नाही किंवा अंकुरण होऊन जळण्याची भीती असते. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच शेतकऱ्यांचा वेळ व आर्थिक नुकसान होण्याचीदेखील शक्यता असते. शेतकऱ्यांनी आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी कृषी विभागाच्या संदेशानुसार शंभर मिमी पाऊस पडल्यानंतरच किंवा जमिनीची ओल चार ते सहा इंच अथवा जमिनीमधील उष्णता जाईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, शेतकऱ्यांनी कोणत्याही पिकाची धूळपेरणी करू नये. खरीप हंगामातील सर्व पिके जमिनीत पुरेशी ओल म्हणजेच जमीन चार ते सहा इंच ओल झाल्याची खात्री करूनच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.