अवैध धंद्यांमुळे मेहकर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली! नागरिकांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन म्हणाले बंद करा, अन्यथा...

 
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मेहकर शहरासह संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. त्यामुळे समाज मनावर वाईट परिणाम दिसून येत आहेत. पोलीस प्रशासनाने या भागातील अवैध धंदे तात्काळ बंद करावे अशी मागणी मेहकरकरांनी केली आहे. याबाबत काल ६ मार्च रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे.
  निवेदनात म्हटले आहे की, मेहकर शहरासह तालुक्यात गेल्या कित्येक दिवसांपासून अवैध धंदे (वरली, मटका, दारू, जुगार,चक्री) जोमाने सुरू आहे. आणि अवैध धंद्यामुळेच येथील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे दिसत आहे. मेहकर शहर हे पवित्र शारंगधरबालाजी,हजरत पंचपीर बाबा यांच्या कृपाशीर्वादाने पावन झालेल शहर आहे. त्यामुळे या शहराला ऐतिहासिक महत्त्व व अध्यात्मिक परंपरा लाभलेली आहे. शहरात अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून येतात परंतु गल्ली बोळात सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे त्यांच्या मनावर वाईट परीणाम दिसू लागले आहेत. त्याचप्रमाणे मोल मजुरी करणारे सामान्य माणसे सुध्दा ह्या अवैध धंद्याकडे आकर्षित होवुन दिवसाकाठी कमावलेली कमाई अवैध धंद्यात टाकतात. अश्या पद्धतीने कष्टकऱ्यांचा पैसा वाममार्गाला जात असल्याचं पाहायला मिळतेय. त्यामुळे अनेकांचे संसार उद्वस्त होण्याची वेळ आली आहे. या सर्व बाबींचा विचार करून मेहकर तालुका व शहरात सुरू असलेले अवैध धंदे त्वरीत बंद करण्यात यावे,अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष गजानन जाधव,विनोद गवई,पुष्पा नरवाडे,प्रभा मोरे,नाजमीन शेख,संगीता गवई व इतरांनी निवेदनाद्वारे केली आहे.मागणीकडे दुर्लक्ष केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.