बुलडाण्यात लालपरीचे आजवर 18,20,00,000 रुपयांचे नुकसान!

संपाचा ४८ वा दिवस, कर्मचारी ठाम, तिकडे सरकारही ढिम्म!!
 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्‍य सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या भांडणात लालपरीचे मोठे नुकसान रोज होत आहे. कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज, ४८ वा दिवस आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील नुकसानीचाच आकडा समोर घेतला तर लालपरीचे तब्बल १८ कोटी २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. बुलडाणा विभागात २४४६ कर्मचारी असून, आतापर्यंत ३५६ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. मात्र कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश कर्मचारी कार्यशाळेतील असल्याने चालक, वाहकांविना जिल्ह्यातील ४३१ बसेस धुळखात उभ्या आहेत.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी संप आटोपल्याचे जाहीर केल्यानंतर राज्यभरातील ठिकठिकाणच्या आगारांमधील काही बसगाड्या सुरू झाल्या असल्या तरी अजूनही बहुतांश कर्मचारी कामावर जायला तयार नाहीत. जोपर्यंत विलिनीकरणाचा ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही कामावर जाणार नाही, अशी भूमिका बुलडाणा जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

दरम्यानच्या काळात परिवहन मंत्र्यांनी पगारवाढीची घोषणा करूनही कर्मचाऱ्यांचे समाधान झालेले नाही. बुलडाणा विभागातील ३५६ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. जिल्ह्यात एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. मात्र अजूनही कर्मचारी मागे हटायला तयार नाहीत. अधूनमधून काही बसेस आगारातून बाहेर काढण्यात आल्या. मात्र त्या बसेसमध्ये प्रवाशांऐवजी अधिकाऱ्यांनीच प्रवास केला.

मात्र आज आंदोलनाच्या ४८ व्या दिवशी बुलडाणा -धाड ही बस आगारातून पोलीस बंदोबस्तात बाहेर काढण्यात आली. औरंगाबाद आगारातूनही दोन बस बुलडाण्यात आल्या. मात्र प्रवाशांची नेहमीसारखी गर्दी बसस्थानकावर दिसून आली नाही. आमच्यातून केवळ दोन कर्मचारी कामावर हजर झाले असून ते गद्दार आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया संपकरी कर्मचाऱ्यांनी दिली. जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत फासावर लटकवले, गोळ्या घातल्या, चाकाखाली चिरडले तरी आम्ही माघार घेणार नाही, असा निर्धार संपकरी कर्मचाऱ्यांनी केला.

जिल्ह्यात अठरा कोटी वीस लाख रुपयांचे नुकसान
२ नोव्हेंबर रोजी विभागीय स्तरावर कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला. ७ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील सर्वच आगारांतील कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला. त्यामुळे गेल्या ४८ दिवसात बुलडाणा विभागात १८ कोटी २० लाख रुपयांचे नुकसान झाले.