लाखो रुपये खर्चून शिदोरीगृह बांधले पण...आता बेकार दुरावस्था; लोक येऊन मुततात ! चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त सभापती लक्ष देतील का?

 
gnaesh dundhale
चिखली(गणेश धुंदळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी काही महिन्यांआधी आटोपली. आतापर्यंत सहकाराच्या भावनेतून लढविण्यात येणाऱ्या या निवडणुका यंदा तर  पूर्णपणे राजकीय झाल्या. कुणी जिंकले तर कुणाचा पराभव झाला..सभापतींचे पदग्रहण सोहळेही झाले..त्यामुळे आता राजकारण संपवून थेट कामाकडे लक्ष देणे नव्या पिढीचे संचालक मंडळाकडून अपेक्षित आहे..अर्थात नव्या संचालक मंडळाने सूत्रे हाती घेऊन अवघे काही दिवस झाल्याने आत्ताच त्यांच्या कामाचे मूल्यमापन करणे चुकीचे ठरेल. मात्र काही प्रमुख कामांकडे बाजार समिती प्रशासनाने  लक्ष द्यायला सुरुवात करणे गरजेचे आहे. त्यापैकी एक विषय आहे तो चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बांधलेल्या शिदोरी गृहाचा..
 

२०११ -२०१२ मध्ये तत्कालीन संचालक मंडळाने महाराष्ट्र कृषी स्पर्धा क्षण प्रकल्पाअंतर्गत लाखो रुपये खर्चून शिदोरीगृह बांधले. बाजार समितीत शेतमाल विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना, हमाल बांधवांना दुपारचा जेवणाचा डब्बा तिथे खाता यावा, काम होईपर्यंत थोडीफार विश्रांती घेता यावी हा त्यामागचा उद्देश बांधकाम करतांना सांगण्यात आला होता. मात्र ज्या उद्देशासाठी लाखो रुपये खर्चून शिदोरीगृह बांधण्यात आले तो उद्देश मात्र बाजूलाच राहिल्याचे दिसत आहे. 
    

सद्यस्थितीत या शिदोरीगृहाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. शिदोरीगृहाच्या दरवाजाजवळ जायचे म्हटले तरी नाकाला रुमाल लावून जावे लागते. डुकरांचा मुक्त संचार सुरू आहे एवढेच काय तर शिदोरीगृहाच्या भिंती मुत्रविसर्जनासाठी उपयोगात आणल्या जात आहेत. अधूनमधून हे शिदोरीगृह काही व्यापाऱ्यांना भाड्याने सुद्धा दिल्या जात असल्याचे कळते. त्यामुळे ज्या उद्देशाने शिदोरीगृह बांधले त्या उद्देशांना हरताळ फासल्या जात असल्याचे शेतकऱ्यांनी "बुलडाणा लाइव्ह" शी बोलताना सांगितले. नवनियुक्त सभापती आणि संचालकांनी याकडे लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.