कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर कासम गवळी ठरले नगराध्यक्षपदासाठी अपात्र!

मंत्री एकनाथ शिंदेंचा आदेश, सहा वर्षे नगरपरिषद निवडणूक लढता येणार नाही!!
 
कासम गवळी
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकरचे नगराध्यक्ष कासम गवळी यापुढे सहा वर्षे निवडणूक लढवू शकणार नाहीत. त्‍यांना नगराध्यक्षपदासाठी अपात्रसुद्धा ठरविण्यात आले आहे. विशेष म्‍हणजे गवळींचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी हा आदेश बजावला आहे.

खासदार प्रतापराव जाधव यांनी नगराध्यक्ष गवळी यांनी केलेल्या गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी केली होती. त्‍यानुसार राज्‍य सरकारने चौकशी समिती नेमली होती. या समितीने चौकशी करून अहवाल सरकारकडे सादर केला होता. त्‍यात समितीने गवळी यांचा सकृतदर्शनी दोषी ठरवले होते व कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. या नोटिसीला गवळींनी केराची टोपली दाखवली होती.

नुकतीच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्‍फरन्सिंगद्वारे अंतिम सुनावणी घेतली होती. दोन्‍ही बाजूंकडील म्‍हणणे ऐकून मंत्री शिंदे यांनी गवळी यांना पुढील सहा वर्षांसाठी नगरसेवक म्‍हणून निवडून जाण्यासाठी अपात्र ठरवले आहे. शिवाय नगराध्यक्ष पदासाठीही अपात्र ठरवले आहे. उल्लेखनीय म्‍हणजे कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर गवळींचे नगराध्यक्षपद गेले असून, यापूर्वी त्‍यांच्या पत्‍नी हसीनाबी गवळी यांनाही नगरसेवकपदी अपात्र ठरवण्यात आलेले आहे. आता मंत्री शिंदेंच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्याची तयारी गवळींनी केली आहे.