डॉ.सदानंद देशमुख यांच्या ‘तहान’ कादंबरीवरीलकलामंथन निर्मित ‘तहान’ नाटक सोमवारी बुलडाण्यात ! सहकार विद्या मंदिराच्या सभागृहात होणाऱ्या नाटकासाठी प्रवेश निःशुल्क..!

 
jghj

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): १९८० ते २००० ही दोन दशकं ग्रामीण भागात पाणी टंचाईनं प्रचंड तहानलेली, त्यावेळी पाणी पुरवठा योजना वा नळयोजना.. असं काहीच नव्हतं. डोक्यावर हंडे घेवून महिलांची रणरणत्या उन्हात पाण्यासाठीची भटकंती चालू होती. या पाणीटंचाईच्या झळा समाजव्यवस्थेला बसत होत्या. पाणी टंचाईचा तोच काळ ‘तहान’ या कादंबरीतून प्रा.डॉ. सदानंद देशमुख यांनी तेवढ्याच जीवंतपणे अन् ज्वलंतपणे १९९४ साली मराठी साहित्याच्या पटलावर आणला. अर्थात ती कादंबरी प्रचंड गाजली. अनेक पुरस्कार तिला मिळाले.. काळ बदलला, पण ‘तहान’ भागली नाही.. ‘इथे प्रत्येकाचीच तहान वेगळी..’ या आशयातून ‘तहान’ तेवढीच जीवंत अन् ज्वलंत राहीली. दोन वर्षापुर्वी ‘कलामंथन ठाणे’ या गाजलेल्या नाट्यसंस्थेने ‘तहान’ कादंबरीवर नाटक आणले, अन् या नाटकालाही अनेक पुरस्कार मिळाले. मुंबई, ठाणे, पुणे सह बेळगावपर्यंत प्रेक्षकांची वाहवा मिळवलेल्या या नाटकाचा प्रयोग ज्या भूमितून हे नाटक तयार झाले, त्या बुलढाणा जिल्ह्यात येत्या सोमवार ५ जून रोजी सायंकाळी ८ वाजता सहकार विद्या मंदीराच्या सांस्कृतिक सभागृहात होत आहे. विशेष म्हणजे हे नाटक सर्वांसाठी खुले असून निशुल्क असणार आहे.

‘बारोमास’ या नाटकाचा मागील वर्षी ५ जूनला बुलढाणा येथे यशस्वी प्रयोग झाल्यानंतर, बरोबर १ वर्षानी सोमवार ५ जून रोजी प्रा.डॉ.सदानंद देशमुख यांच्या ‘तहान’ या नाटकाचा प्रयोग बुलढाण्यात होत आहे, हे येथे विशेष !