जमल बॉ एकदाच! चिखलीला ठाणेदार मिळाले; थेट मुंबईवरून खमक्या अधिकाऱ्याची एन्ट्री; पदभार स्वीकारला...

 
पोलिस
चिखली(कृष्णा सपकाळ: गणेश धुंदाळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या कैक महिन्यापासून कायमस्वरूपी ठाणेदारावीना वाऱ्या.वर सोडलेल्या चिखली पोलीस स्टेशनला आज दिप अमावस्येच्या मुहूर्तावर नवीन ठाणेदार मिळाले. आधी जिल्ह्यात राहून गेलेल्या मात्र चिखलीला येण्याआधी मुंबई गाजवणाऱ्या खमक्या अधिकाऱ्याच्या खांद्यावर एसपी सुनील कडासने यांनी चिखलीच्या ठाणेदार पदाची जबाबदारी सोपवली.गतकाळातील अनेक घटना बघता चिखलीचे ठाणेदार पद म्हणजे काटेरी मुकुटासारखे आहे, त्यामुळे तो काटेरी मुकुट पेलण्याची क्षमता असलेल्या अधिकाऱ्याच्या शोधात एसपी होते. अखेर संग्राम पाटील यांची मुंबईवरून जिल्ह्यात बदली होताच त्यांच्यावर एसपी कडासने यांनी चिखलीच्या ठाणेदारपदाची धुरा सोपवली. आजच त्यांनी प्रभारी ठाणेदार सारंग नवलकार यांच्याकडून सूत्रे स्विकारली.
add
                जाहिरात 
 जिल्ह्यातील "अ" वर्ग दर्जाचे ठाणे असुनही चिखलीला अशोक लांडे यांच्यानंतर कायमस्वरूपी ठाणेदार मिळत नव्हते. मधल्या काळात भुषण गावंडे, विलास पाटील, जयवंत सातव, सारंग नवलकार यांनी प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळली. कायमस्वरुपी ठाणेदार मिळावा म्हणून शिवसेनेच्या वतीने ठेचा भाकर आंदोलन देखील करण्यात आले होते. अखेर आज १७ जुलैला एसपी सुनील कडासने यांनी संग्राम गावंडे यांची चिखली ठाणेदार म्हणून नियुक्ती केली.
 याआधी देखील गाजवलाय जिल्हा..!
 २०२० पूर्वी संग्राम पाटील यांनी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात ठाणेदार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. एपीआय असताना बुलडाणा शहर, धामणगाव बढे, स्थानिक गुन्हे शाखा , धाड त्यानंतर साखरखेर्डा येथे ठाणेदार म्हणून पाटील यांची कामगिरी लक्षवेधी होती. कोरोना काळात साखरखेर्डा येथे असताना त्यांनाही कोरोना आजाराचा सामना करावा लागला होता, मात्र त्यांनी त्यावर यशस्वी मात केली होती. पीआय म्हणून बढती मिळाल्यावर ते मुंबईत गेले होते, तिथेही त्यांनी कामाचा ठसा उमटवला त्यानंतर आता पुन्हा त्यांची बुलडाणा जिल्हा वापसी झाली, आता चिखलीचे ठाणेदार म्हणून ते जबाबदारी सांभाळणार आहेत.
  आव्हानांचा डोंगर मोठा..!
आधीच म्हटल्याप्रमाणे चिखलीचे ठाणेदार पद म्हणजे काटेरी मुकुट आहे. त्यामुळे आव्हानांचा मोठा डोंगर संग्राम पाटील यांच्यासमोर असणार आहे. गत काळात अवैध गुटख्याचे मोठे केंद्र म्हणून चिखलीचे नाव झाले आहे, शिवाय गल्लोगल्ली उघड्यावरील अवैध धंदे, छोट्या मोठ्या गुन्हेगारांची वाढलेली हिम्मत, छेडखानीच्या घटना याला आवर घालण्याचे काम करावे पाटील यांना करावे लागणार आहे. खमक्या अधिकारी ही बिरुदावली टिकवून ठेवायची असेल तर संग्राम पाटील यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.