अमरावती विभागीय अधिस्विकृती समितीवर पत्रकार राजेंद्र काळे! महाराष्ट्र शासनाने केली निवड
Jul 11, 2023, 21:13 IST
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे राज्य आणि विभागीय अशा दोन्ही स्तरावरील अधिस्किृती समितीची घोषणा आज मंगळवार ११ जुलै रोजी करण्यात आली. यात अमरावती विभाग अधिस्विकृती समितीवर ‘दै.देशोन्नती’चे बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे यांची नियुक्ती शासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रिमा दत्तरॉय यांच्या स्वाक्षरीनिशी काढण्यात आलेल्या विशेष नियुक्ती पत्रात शासनाने राज्य अधिस्विकृती समिती व ९ विभागातील अधिस्विकृती समित्या गठीत केल्या. यामध्ये अमरावती विभागातून पहिल्याच क्रमांकावर राजेंद्र जगन्नाथ काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह जयराम अहुजा, सुरेंद्रकुमार आकोडे, रविंद्र लाखोडे व गोपाल हरणे हे ५ सदस्य या विभागीय अधिस्विकृती समितीवर आहेत. या समितीचा कार्यकाळ कालावधी ३ वर्षासाठी असणार आहे.
प्रसारमाध्यमांशी संबंधीत व्यक्तींना अधिस्विकृती देण्या-संबंधी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्विकृती नियम २००७ संदर्भातील शासन निर्णयानुसार या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. राज्य अधिस्विकृती समितीवर २७ सदस्यांची तर प्रत्येक विभागात ५ सदस्यांची अशा ९ विभागातील ४५ सदस्यांची नेमणूक आज करण्यात आली. अमरावती विभागातून मराठी पत्रकार परिषदेने नामनिर्देशीत केल्याप्रमाणे अमरावती विभागातून राजेंद्र काळे यांची पहिल्या क्रमांकावरच सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. हा सन्मान खूप वर्षांनी बुलढाणा जिल्ह्याला प्राप्त झाला आहे.
‘दै.देशोन्नती’मध्ये गत २७ वर्षापासून जिल्हा प्रतिनिधी म्हणून राजेंद्र काळे हे काम पाहत आहेत. त्यांच्या ‘वृत्तदर्पण’ या साप्ताहिक सदराने सलग ९०० भागाचा टप्पा पार केला आहे. मराठी पत्रकार परिषदेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष तथा अमरावती विभागीय चिटणीस व राज्य उपाध्यक्ष म्हणून त्यांनी संघटनात्मक काम करुन पत्रकारांचे विविध प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यांच्या नियुक्तीचे सर्वच क्षेत्रातून उत्स्फूर्त स्वागत होत असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.