माय बाप समजून घेताना जिजामाता प्रेक्षागार गहिवरले! ह.भ.प. सोपान महाराज कनेरकर म्हणाले "लेकरांनो मायबापाला दैवत समजा"

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिव विचारांचा जागर करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शस्त्रप्रदर्शनी कार्यक्रमाने काल सुरुवात झाली. आज १७ फेब्रुवारीला "माय बाप समजून घेताना" या विषयावर सुप्रसिद्ध युवा प्रबोधनकार ह.भ. प सोपान महाराज करनेकर यांचे व्याख्यान पार पडले. येथील जिजामाता प्रेक्षागार या ठिकाणी संपन्न झालेल्या या संस्कार व्याख्यानाला शहरातील जवळजवळ सर्वच विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. ह.भ.प सोपान महाराज यांच्या व्याख्यानातून " मायबाप समजून घेताना उपस्थित सर्वच गहिवरून गेल्याचे चित्र निर्माण झाले होते. यावेळी हजारो विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.
बुलडाणा
 यावेळी आपल्या व्याख्यानातून सोपान महाराज म्हणाले की, माय बाप म्हणजेच परमेश्वराचा अवतार आहे. त्यामुळे माय बापांची पुजा आपण नेहमी केली पाहिजे. माय - बाप आहे म्हणून आपण आहोत. म्हणून आयुष्यात कधीच त्यांना निराश करू नका, त्यांच्या मनाला वेदना होतील असा निर्णय घेऊ नका, कुठलाही वाईट विचार मनात येण्याआधी आपल्या परमेश्वराचा अर्थात मायबापाचा चेहरा डोळ्यांसमोर आणा. ज्या बापान आपल्या शिक्षणासाठी हाडाची काड केली रक्ताच पाणी केलं, त्याचा सन्मान करायचा असेल तर आयुष्याच्या स्पर्धेत ' प्राविण्य ' मिळवा. 
पुढे बोलताना ह.भ. प सोपान महाराज यांनी अनेक दृष्टांतांचा उवापोह केला.सार्वजनिक शिवजयंती समिती २०२४ चे अध्यक्ष तथा बुलडाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून तसेच आयोजनातून पार पडत असलेले विविध कार्यक्रम बुलडाणा शहरासाठी ऐतिहासिक व प्रेरणादायी ठरत आहे.जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या हस्ते व्याख्यान कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले होते.