जमल बॉ! गॅस सिलेंडरचे गोडावून फोडणाऱ्या टोळीचा छडा लागला! एकाला अटक केली त्याने साथीदारांची नावे सांगितली; ३० गॅस सिलिंडर जप्त

 
police station

बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लावणाऱ्या गॅस सिलिंडर चोरट्यांच्या टोळीतील एका आरोपीला गजाआड करण्यात पोलिसांनी यश मिळवले आहे. बुलढाण्यातीलच चौघांनी गॅस सिलिंडर चोरीकांड घडवले. शहरातील अन्य एका गॅस एजन्सीवर काम करणारा आरोपी दामोदर गायकवाड याने थेट पोलिसांच्याच अखत्यारीत चोरी करून पोलीस प्रशासनाचे वाभाडे काढले. या आरोपीकडून गॅस सिलिंडर वाहून नेणारा ॲपे व चोरलेले ३० गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.

पोलीस मुख्यालयाच्या मागे पोलीस कल्याण शाखेमार्फत चालविण्यात येणाऱ्या भारत गॅस कंपनीचे दीपक गॅस एजन्सीचे गोडाऊन आहे. पोलीस कुटुंबीयांसाठी या गोदामात गॅस सिलिंडर उपलब्ध केले जातात. ४ एप्रिलच्या मध्यरात्री चोरट्यांनी गोडाऊन फोडून तब्बल ३० सिलिंडर चोरून नेत पोलिसांना सलामी दिली. या प्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा नोंदवून तपासकार्याला वेग देण्यात आला.
ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या सुचनेनुसार डीबी पथकाने गोपनीय माहिती व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत गुन्हा दाखल झाल्याच्या काही तासांनी आरोपी दामोदर तोताराम गायकवाड (४५, रा. भीमनगर, वॉर्ड क्रमांक २) यास ताब्यात घेत कसून चौकशी केली. त्याने सुनील संजय काळे उर्फ लेमन (रा. भीमनगर), नामदेव आनंदा खिल्लारे (क्रांतीनगर, बुलढाणा) व दीपक सुरेश गोलांडे (संभाजीनगर, बुलढाणा) या साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच चोरलेले ३० सिलिंडर आणि ॲपे वाहन (क्रमांक एमएच-२८-ए-०१५४) असा २ लाख १९ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अन्य फरार आरोपींचा विशेष पथक शोध घेत आहे.

 
डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक सखाराम सोनुने, सहायक फौजदार माधव पेटकर, पोहेकॉ प्रभाकर लोखंडे, सुनील जाधव, महादेव इंगळे, नाईक पोलीस शिपाई गजानन जाधव, गंगेश्वर पिंपळे, पोलीस शिपाई युवराज शिंदे, विनोद बोरे, शिवहरी सांगळे, नाईक पोलीस शिपाई सुनीता खंडारे यांनी आरोपीस शिताफीने पकडले. या गुन्ह्याचा तपास पोहेकॉ शेख कय्यूम व नाईक पोलीस शिपाई सुभाष मांटे करीत आहेत.