देखणा ठरला बुलडाण्यातील भूमिपुत्राचा सन्मान सोहळा! ना.प्रतापराव जाधव म्हणाले, निवडणुकीच्या प्रचारात मी महायुतीचा उमेदवार होतो आता मात्र तुमच्या सर्वांचा! पुढच्या ५ वर्षात खूप काही करायचंय म्हणाले...
Updated: Jun 30, 2024, 20:37 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दुपारी सव्वाअकराच्या पूर्वनियोजित कार्यक्रम..पण लाडक्या नेत्याला दिल्लीत मंत्रीपद मिळाल्यामुळे जाम खुश झालेल्या जनतेने स्वागतासाठी केलेली प्रचंड गर्दी.. त्यामुळे बुलडाणा रोडवरील प्रतापगड कमानीपासून सुरू झालेली रॅली नियोजित ओंकार लॉन या कार्यक्रम स्थळी पोहोचायला तब्बल दोन ते अडीच तास लागले..अखेर ना.प्रतापराव जाधवांची वाजत गाजत मिरवणूक कार्यक्रम स्थळी पोहचली...तिथेही त्यांचे जंगी आणि देखणे स्वागत झाले..तब्बल ३ वेळेस आमदार ,सलग चौथ्यांदा खासदार आणि आता देश पातळीवर नेतृत्व करणाऱ्या या नेत्याच्या स्वागत सोहळ्यासाठी प्रचंड गर्दी ओंकार लॉनवर जमली होती.मंचावर पक्ष, संघटना, राजकीय विरोध सगळ बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेतेमंडळी हजर होती..कारण हा सन्मान शिवसेनेच्या प्रतापरावांचा नव्हता तर दिल्लीच्या तख्तावर विराजमान होऊन देशाचे नेतृत्व करणाऱ्या बुलडाणा जिल्ह्याच्या भूमिपुत्राचा होता..हा सन्मान मातीतल्या लोकांनी आपल्या मातीतल्या माणसाचा केलेला गौरव सोहळा होता..त्यामुळे आपल्याच माणसांनी आपल्या माणसाचा केलेला हा सन्मान सोहळा देखणा आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला..या सन्मान सोहळ्याला उत्तर देणारे ना.प्रतापराव जाधवांचे भाषण या कार्यक्रमाचा उत्कट बिंदू ठरला.."निवडणूक प्रचारात मी एका पक्षाचा, महायुतीचा उमेदवार होतो...मात्र आता निवडून आल्यानंतर मी तुम्हा सर्वांचा आहे, ज्यांनी निवडणुकीत विरोध केला त्यांचाही आहे..कोणतीही कटुता मनात न ठेवता सगळ्यांची कामे करण्याची जबाबदारी माझी आहे" ह्या ना प्रतापरावांच्या शब्दांनी सगळ्यांनाच जिंकून घेतले. आ.डॉ.राजेंद्र शिंगणे, भाईजी चांडक, आ.संजय गायकवाड , आ. धीरज लिंगाडे, माजी आमदार विजयराज शिंदे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार धृपदराव सावळे, योगेंद्र गोडे, साहित्यिक सदानंद देशमुख यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांची मंचावर उपस्थिती होती.
सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला, कुठलाही राजकीय वारसा नसतांना एकदा दोनदा तीनदा नव्हते तर चौथ्यांदा सभागृहात पाठवल्याबद्दल ना.जाधव यांनी कृतज्ञता व्यक्त केली. माझ्या राजकीय जीवनाची सुरूवात कुठलेही पद मिळावे या अपेक्षेने केली नव्हती, हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेशी जोडल्या गेलो असे ना.जाधव म्हणाले. आपला जन्म सत्तेसाठी नाही तर लोकांची कामे करण्याची आहे ही बाळासाहेबांची शिकवण होती, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या शिकवणीवर काम केल्यानेच तुमच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोहचलो असे ना.जाधव म्हणाले.
जनतेच्या आशीर्वादाने पहिल्यांदा आमदार होऊन पाटबंधारे खात्याचा मंत्री झालो तेव्हा वर्षभरात जिल्ह्यातील सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केल्याचे ना.जाधव म्हणाले. खडकपूर्णाची प्रशासकीय मान्यता, जिगावची प्रशासकीय मान्यता रद्द झाली होती. खडकपूर्णा प्रकल्पाला मराठवाड्याचा विरोध होता, त्यावेळी मोठा विरोध झेलून खडकपुर्णा प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळवून दिल्याची आठवण ना.जाधव यांनी सांगितली. आताही आयुष आणि आरोग्य मंत्रालयाचे काम करण्यासाठी खूप वाव आहे. दोन्ही मंत्रालयांच्या कामांचा थेट जनतेशी संबंध आहे, त्यामुळे सामान्य जनतेची सेवा करायला मिळणार असल्याने आनंद आहे असे ना.जाधव म्हणाले.
निवडणूक प्रचारात सातत्याने मी केलेली कामे सांगितली, खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी केलेले प्रयत्न, समृध्दी महामार्ग, नदीजोड प्रकल्प यावर मी बोलत होतो.मात्र हे मुद्दे मला निवडणुकीत दिसले नाही, कुणी केलेल्या कामांचे कौतुक केले नाही. खामगाव जालना रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली तेव्हा १०० - २०० फोन आले,
पण नदीजोड प्रकलपासाठी दोन चार शेतकरी सोडले तरी कुणी फोन केला नाही. नदीजोड प्रकल्प हा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे, ७० टक्के जमीन सिंचनाखाली येणार आहे नदीजोड प्रकल्प जेव्हा पूर्ण होईल तेव्हा शेतकरी आत्महत्या थांबतील, शेतकरी ३ - ३ पिके घेईल.पुढच्या ५ वर्षात खामगाव जालना रेल्वेमार्ग काम सुरू होईल असे ना.जाधव म्हणाले. विविध खात्यांची समन्वय ठेवून लोणार आणि मातृतीर्थ सिंदखेड राजाच्या प्रलंबित प्रश्नांवर काम करणार असल्याचेही ते म्हणाले. राज्यात आणि केंद्रात समविचारी सरकार असले तर विकासाचा वेग वाढतो असे म्हणत राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा महायुतीचे सरकार असले पाहिजे असे ते म्हणाले. मात्र वेळीच हा सर्वपक्षीय सन्मान सोहळा असल्याचे लक्षात येताच त्यांनी हा विषय थांबवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागरी सत्कार सोहळा समिततीचे अध्यक्ष राजेंद्र काळे यांनी तर बहारदार सूत्रसंचालन जया भारती यांनी केले...