पत्रकारांच्या लेखणीमुळेच विकासाला बळ! दिनेश गीतेंचे प्रतिपादन! विश्वंभर वाघमारे म्हणाले, व्हॉईस ऑफ मीडिया सर्वव्यापी संघटना! बुलडाण्यात व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने सेवानिष्टेचा गौरव सोहळा..

 
बुलडाणा: पत्रकार समाजासाठी झटणारा निस्वार्थी कार्यकर्ता असतो. आजच्या स्वार्थी युगात हा गुण दुर्मिळ झाला असला तरी पत्रकार मात्र निस्वार्थपणे समाजाची सेवा करतात.वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करणारे पत्रकार मात्र अनेक सेवा सुविधांपासून वंचित राहतात. व्हॉईस ऑफ मीडिया ही देशव्यापी संघटना पत्रकारांच्या कल्याणासाठी राबवत असलेले उपक्रम स्तुत्य आहेत. पत्रकारांच्या लेखणीमुळेच विकासाला बळ मिळते असे प्रतिपादन सेवानिवृत्त निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी केले. बुलडाण्यात व्हॉईस ऑफ मीडियाचे वतीने आयोजित सेवानिष्ठेचा सत्कार सोहळ्यात ते सत्काराला उत्तर देतांना बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के तर मंचावर सत्कारमुर्ती विश्वंभर वाघमारे, सत्कारमुर्ती रमेश घेवंदे, सत्कारमुर्ती चंद्रभूषन मुंगे, कोअर कमिटी सदस्य अरुण जैन, विदर्भ संघटक सिद्धार्थ आराख, जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे उपस्थित होते.
  यावेळी ज्येष्ठ पत्रकार विश्वंभर वाघमारे यांनी व्हॉईस ऑफ मीडिया ही सर्वव्यापी संघटना असल्याचे सांगत संघटनेच्या कामाला शुभेच्छा दिल्या. सेवानिवृत्त झालेला माणूस प्रशासनाच्या पडद्याआड जातो परंतु व्हॉईस ऑफ मीडियाने आमची दखल घेत आमचा सत्कार घडवून आणला त्याबद्दल आम्ही ऋणी आहोत असे प्रतिपादन सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश घेवंदे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के म्हणाले की, राज्यात पत्रकारांच्या आधीच १२९ संघटना असताना १३० व्या संघटनेची गरज पडली कारण, पत्रकारांच्या मुळ समस्या जैसे थे आहेत. पंचसूत्रीच्या आधारावर राष्ट्रीय नेतृत्व असलेल्या संदीप काळे यांच्या मार्गदर्शनात पत्रकारांच्या समस्या सोडविण्याचे काम व्हॉईस ऑफ मीडिया करीत आहे. महाराष्ट्राच्या मातीतून उभे राहिलेले हे संघटन देशपातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पाऊल ठेवत आहे. पद हे मिरवण्यासाठी नव्हे तर काम करण्यासाठी आहे आणि त्यावरच आपले मार्गक्रमण सुरू राहील अशी ग्वाही यावेळी अनिल म्हस्के यांनी दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस गजानन धांडे, सूत्रसंचालन अभिषेक वरपे तर आभार शहराध्यक्ष गणेश निकम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप वंत्रोले, शौकत शहा,रमेश उगले, आदेश कांडेलकर,राहुल रिंढे, अक्षय थिगळे, ओम सोळंकी यांनी परिश्रम घेतले.
  यांचा झाला गौरव...
प्रशासकीय सेवेत असताना समाजाभिमुख प्रशासन राबविणाऱ्या सेवानिवृत्त निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश घेवंदे यांच्यासह पत्रकारितेतील योगदानासाठी ज्येष्ठ पत्रकार विश्वंभर वाघमारे व चंद्रभुषण मुंगे यांचा यावेळी गौरव करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार राजेश डिडोळकर यांची कन्या सिध्दी डिडोळकर हीचा क्रीडा क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी तर पत्रकार प्रेम राठोड यांचे चिरंजीव वैभव राठोड यांची एसबीआय मध्ये व ऋषीकेश लक्ष्मीकांत बगाडे यांची टीसीएस मध्ये निवड झाल्याबद्दल व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने सन्मान करण्यात आला.