हा निधी घोटाळा की आणखी काही?; न. प. शाळेच्या मुत्रिघरावर चक्क स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिका केंद्राचा बोर्ड!

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मुत्रिघरावर लावण्यात आलेला स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राचा फलक सध्या बुलडाण्यात चर्चेला आला आहे. कारंजा चौकातील बुलडाणा नगर परिषदेच्या शाळा क्रमांक ९ मधील मुत्रिघरावर हा बोर्ड लागलेला आहे. हा प्रकार नक्की कशासाठी केला गेला, हा मोठा प्रश्न आहे. जिल्हा परिषदेने ही शाळा २०१० मध्ये नगर परिषदेला हस्तांतरित केली होती. त्यानंतर २०१९ पर्यंत ही शाळा सुरू होती. मात्र पटसंख्येअभावी २०१९ पासून शाळा बंद असून, शाळेतील मुत्रिघरावर आता अभ्यास केंद्राचा बोर्ड पाहून आश्चर्य व्यक्‍त केले जात आहे.

पहा व्हिडिओ ः

नगरपरिषद बुलडाणा स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र असा उल्लेख या बोर्डवर असल्याचे बुलडाणा लाइव्हला कळताच बुलडाणा लाइव्हने याची पडताळणी केली असता मुत्रिघरावर हा बोर्ड लागलेला दिसला. हा आश्चर्यजनक प्रकार नगर परिषदेच्या शिक्षण विभागाला सांगितला असता शिक्षण विभागातर्फे असे कोणतेही स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र चालविण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्राचा हा बोर्ड लावला कुणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अभ्यासिकेच्या नावाखाली कुणी निधी तर हडपला नाही ना, अशीही शंका व्यक्‍त केली जात आहे. तसे असेल तर मुख्याधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज असून, सत्य समोर येणे आवश्यक आहे.

काय दिसले...
शाळेच्या खोल्या सुस्थितीत असल्या तरी शाळा सध्या मोकाट कुत्र्यांचे घर झाली आहे. स्पर्धा परीक्षा केंद्राचे बोर्ड लावलेली इमारत स्वच्छतागृहाची असल्याचे दिसून आले. आतील स्थिती या बातमीसोबत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला पाहता येईल.

११ शाळांपैकी दोन बंद...
बुलडाणा नगरपरिषदेच्या शहरात ११ शाळा असून त्यापैकी दोन शाळा पटसंख्येच्या अभावी बंद करण्यात आल्या आहेत. सध्या ६ मराठी आणि ३ उर्दू शाळा नगरपरिषदेच्या वतीने चालविण्यात येतात. ६ मराठी शाळांसाठी १४ तर ३ उर्दू शाळांसाठी १९ शिक्षक सध्या कार्यरत आहेत. ९ शाळांमध्ये जवळपास १००० विद्यार्थी शिक्षण घेतात.

बुलडाणा नगरपरिषदेच्या शिक्षण विभागातर्फे कुठेही स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र आतापर्यंत चालविण्यात आलेले नाही. मात्र भविष्यात तशी गरज निर्माण झाली तर विद्यार्थ्यांना अभ्यासाची सोय निर्माण व्हावी यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करेल.
- संजय जाधव, प्रशासन अधिकारी, नगर परिषद बुलडाणा