SUNDAY SPECIAL काय रावं संजुभाऊ असं कुठ असतं का? तुम्ही तं दोस्त हे आमचे...
Updated: Jul 28, 2024, 11:49 IST
बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड सदा सर्वदा चर्चेत असतात..अंगावर येणाऱ्याला शिंगावर घ्यायचा त्यांचा स्वभाव..अवघ्या ५ वर्षात महाराष्ट्रला ते परिचित झाले..अर्थात परिचित होण्याची कारणे काहीकां असुदेत..'नाम तो हुआ.."! बुलडाणा विधानसभा मतदारसंघात विकासनिधी आणण्यात देखील ते टॉपवर आहेत..शेकडो, हजारो कोटींचीच भाषा त्यांना आवडते.. आता पुन्हा दुसऱ्यांदा विधानसभेचा गड सर करण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे..गावागावात शाखा उद्घाटन, भूमिपूजन, प्रवेश सोहळे यावर त्यांनी चांगलाच जोर दिलाय..विरोधकांकडे कार्यकर्तेच शिल्लक ठेवायचे नाहीत की काय असा प्रणच त्यांनी घेतलाय की काय असे वाटू लागले आहे..आता तर मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनाही ते आपल्या तंबूत खेचत आहेत, यदाकदाचित भविष्यात भाजपसोबत फाटलेच तर त्याचीही पूर्वतयारी आ.गायकवाड यांच्याकडून होत असल्याचे दिसते..!
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत संजय गायकवाड महायुतीचे उमेदवार होते. मात्र त्यावेळी त्यांना भाजपची फारशी मदत झाली नव्हती. कारण योगेंद्र गोडे यांनी अपक्ष म्हणून "पाना" चिन्हावर निवडणूक लढवली होती. भाजप कार्यकर्त्यांचा एक मोठा गट गोडे यांच्या प्रचारासाठी झटतांना दिसला होता. आता भाजपात असलेले माजी आमदार विजयराज शिंदे २०१९ च्या निवडणुकीत वंचितचे उमेदवार होते. विधानसभा निवडणुकीनंतर त्यावेळची शिवसेना महाविकास आघाडी सोबत गेल्याने आ. गायकवाड यांच्या विरोधासाठीच शिंदे तेव्हा भाजपात गेले होते. मात्र अडीच वर्षात मेळ हुकला अन् "ये क्या हुआ" असे म्हणण्याची वेळ विजयराज शिंदेवर आली. आता विजयराज शिंदे आणि आ. गायकवाड यांचे पक्ष एकमेकांचे मित्र असले तरी स्थानिक पातळीवर मात्र त्यांचे एकमेकांशी कट्टर वैर आहे. भाजपच्या गोडेंच्या गटाचेही शिंदेशी पटत नसल्याने गोडे गटाने आ.गायकवाड यांच्याशी थोडीशी जवळीक निर्माण केलेली दिसते. त्यामुळे आ.गायकवाड यांचा आता शिंदेच्या कार्यकर्त्यांवर अटॅक होतांना दिसतोय..
भाजपच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश...
सध्या आ.गायकवाड यांनी सुरू केलेल्या पक्षप्रवेशाच्या धडाक्यात अनेक भाजपचे कार्यकर्तेही त्यांच्या गटात शिरतांना दिसत आहेत. आ.गायकवाड यांच्याकडून ठरवून भाजपच्या कार्यकर्त्यांचे असे प्रवेश होत आहेत का? भाजप मित्रपक्ष असताना आ.गायकवाड यांचा हा अट्टाहास कशासाठी? असे प्रश्न भाजपच्या जुन्या जाणत्या निष्ठावान कार्यकर्त्यांना पडणे स्वाभाविक आहे. मात्र दुसऱ्या बाजूचा विचार केला असता असेही निदर्शनास येते की ज्यांचा प्रवेश आ.गायकवाड करवून घेत आहेत ते कार्यकर्ते भाजप कम विजयराज शिंदे यांचेच अधिक आहेत, जिकडे विजयराज शिंदे तिकडे आपण असे जे शिंदे यांचे निष्ठावान(?) कार्यकर्ते होते ते फोडण्यात आ.गायकवाड यांना जास्त इंटरेस्ट दिसतोय..पण ते काहीका असुदेत..काय रावं संजुभाऊ असं कुठ असतं का? तुम्ही तं दोस्त हे आमचे...असे म्हणण्याची वेळ भाजपच्या कार्यकर्त्यांवर आमदार संजुभाऊंनी आणली आहे..