जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात, उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सन्मान!

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भुसारी म्हणाले, दर्जेदार आरोग्य सेवेसाठी आम्ही वचनबद्ध आहोत! वर्षभरात तपासले ४९८७७१ रुग्ण...
 
बुलडाणा
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हा सामान्य रुग्णालय हे गोर - गरीब, गरजू , मध्यवर्गीय तथा सर्वच घटकातील रुग्ण व त्यांच्या नातलगांसाठी मोठा आधारवड आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णास तातडीने आवश्यक ती रुग्णसेवा देण्यासाठी सर्वच तत्पर असतात. येणारा प्रत्येक रुग्णास दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय वचनबद्ध आहे, अशी ग्वाही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी दिली. स्वतंत्र दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. 
 जिल्हा सामान्य रुग्णालयात देशाचा ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, निवासी वैद्यकीय अधिकारी, सर्व विभागाचे वैद्यकीय अधिकारी, आधिपरिचारिका, परिचारिका, जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्व कर्मचारी तथा जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
स्वच्छता, नियोजन, सेवा आणि समन्वय यामध्ये अव्वल ठरलेल्या तीन वॉर्डांना सर्वोत्कृष्ट वॉर्ड म्हणून पुरस्कार देण्यात आले. पहिला पुरस्कार आपत्कालीन कक्ष, एसएनसीयु विभागास द्वितीय तर वार्ड क्रमांक सहा ला तिसरा क्रमांक देण्यात आला. तसेच उत्कृष्ट कर्मचारी, उत्कृष्ट डॉक्टर यांनाही सन्मानित करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील कर्मचारी रहीम तडवी, गोपाल आसाबे, स्वामीनाथ परिहार यांना देखील उत्कृष्ट कर्मचारी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
पुढे बोलताना डॉ. भुसारी यांनी सांगितले की, आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा म्हणून सर्व कर्मचारी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत आहेत त्यामुळेच रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा येथे मिळतो. जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे, म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयातील सेवेबद्दल नागरिकांचा विश्वास वाढतो आहे हे प्रतीत होते.  
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अंतर्गत जिल्हाभरात वीस संस्था काम करतात. यामध्ये उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, आयुष, अशा विविध विभागांचा समावेश आहे. एकूण १२९४ पदे मंजूर असून त्यातील ६६६ पदे रिक्त आहेत. मनुष्यबळ कमी असले तरीही सर्वजण नियोजनबद्धपणे आपले कर्तव्य पार पाडत असल्याने रुग्णांना योग्य सेवा देणे शक्य होत असल्याचेही डॉ. भुसारी यांनी सांगितले. वर्षभरात तब्बल ४ लाख ९८ हजार ७७१ रुग्ण तपासण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत दोन लाख २४ हजार १७३ रक्त, लघवी व इतर तपासण्या करण्यात आल्या आहेत. वर्षभरात तब्बल २६५० लहान- मोठ्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत.
या वर्षभरात ५५०० दिव्यांगांना प्रमाणपत्र देऊन त्यांचे हक्क मिळवण्याचा लाभ त्यांना दिला आहे तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ५२७ रुग्णांना लाभ देण्यात आला आहे. तब्बल ६६३६ किडनी आजारानेग्रस्त रुग्णांचे डायलिसिस केले जात आहे. महिन्याला सुमारे १६०० किडनी आजार असलेल्या रुग्णांचे डायलिसिस केले जाते तर या वर्षभरात २७२३ रुग्णांचे सिटीस्कॅन करण्यात आले.
स्त्री रुग्णालयात नॉर्मल डिलिव्हरीचे प्रमाण ९०% आहे ही अभिमानास्पद बाब आहे. विविध अडचणींवर मात करून दर्जेदार सेवा देण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका, ब्रदर, कक्षसेवक, सफाई कामगार व इतर सर्व कर्मचारी तत्पर असतात त्यामुळे जिल्हा समाज रुग्णालयाकडे रुग्णांचा ओढा वाढतो आहे. येणाऱ्या प्रत्येक रुग्णास दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय कायम वचनबद्ध आहे अशी ग्वाही यावी डॉ. भागवत भुसारी यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन सॊळंकी यांनी केले.