Amazon Ad

उर्दू भाषिक शाळांमध्ये शंभर टक्के मराठी विषयाचा समावेश करा ! सामाजिक कार्यकर्ते नदीम शेख यांची मागणी

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या उर्दू भाषिक शाळांमध्ये शंभर टक्के मराठी विषयाचा समावेश करण्याची मागणी अल-मदिना एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक नदीम एस.शेख यांनी जिल्हाधिकारी यांच्याकड़े बुधवार २६ जून रोजी निवेदन सादर करुन केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मुस्लिम समाजाची मातृभाषा उर्दू आहे. म्हणुन उर्दु भाषिक शाळांमध्ये पहिली ते कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत प्रत्येक वर्गात मुस्लिम समाजाचे विद्यार्थ्यांना आवर्जुन उर्दू भाषेचा विषय असतो. या सोबत इंग्रजी शंभर टक्के आणि मराठी - हिंदी किंवा मराठी - अरबी या भाषाच 50-50 टक्के देखील समावेश असतो. महाराष्ट्र राज्यातील राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला मराठी भाषा बोलणे, लिहिणे आणि वाचता येणे आवश्यक आहे. अशातच उर्दु भाषिक शाळांमध्ये शंभर टक्के मराठी भाषेचा विषय नसल्या कारणाने मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या वेळी सहाजिकपणे त्रास सहन करावा लागतो. नोकरभरतीसह प्रत्येक शासकीय कामांसाठी मराठी भाषेचा वापर होतो. त्यावेळी मुस्लिम विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत आढळतात. यामुळे जिल्ह्यातील सर्वच उर्दू शाळांमध्ये हिंदी किंवा अरबी भाषिक विषय रद्द करून शंभर टक्के मराठी विषयाचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात यावा, जेणेकरून मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक उज्वल होईल असे निवेदनात म्हटले आहे.