अखेर रस्त्याने जीव घेतलाच..! पांढरदेव एकलारा रस्त्यावर अपघात, दुचाकीस्वाराचा मृत्यू, दोघे गंभीर...

 

चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह):चिखली तालुक्यातील पांढरदेव एकलारा या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली असून, गेल्या अनेक दिवसांपासून प्रवासी त्रस्त आहेत. रस्त्यासंदर्भात संबंधित ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला होता. असे असताना, एक अतिशय गंभीर दुर्घटना पांढरदेव एकलारा या रस्त्यावर घडली. आज २ ऑगस्टच्या सकाळी १० वाजता चिखली येथे जात असताना दुचाकीस्वार व्यक्तीचा खडतर रस्त्यामुळे अपघात होवून जीव गेला.

सदाशिव भीमराव अंभोरे (४२ वर्ष) असे मृतकाचे नाव आहे. अंभोरे हे पांढरदेव येथील रहिवासी होते. आज सकाळी पुतणी शारदा हिच्या मुलाची तब्येत बिघडली असल्याने दोघांना घेवून ते चिखली येथे जात होते. दरम्यान, रस्त्यात नातवाची तब्येत बिघडत चालली होती. त्यामुळे, आंभोरे यांनी आपल्या दुचाकीला वेग दिला. यामध्ये दुचाकीला अपघात होवून ते खाली कोसळले. पुतणी आणि नातवाला किरकोळ दुखापत झाली परंतु अंभोरे यांना गंभीर स्वरूपाचा मार लागला. अपघात घडल्याचे पाहून मागून येणाऱ्या प्रवाशांनी त्यांना दवाखान्यात हलविले. चिखली येथील जवंजाळ हॉस्पिटल मध्ये तिघांनाही दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान डॉक्टरांनी सदाशिव अंभोरे यांना मृत घोषित केले. घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. रस्त्याची बिकट अवस्था अपघातास कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर, रस्त्याचे काम पाहणाऱ्या संबंधित ठेकेदाराने कामाविषयी दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता.