कॅफेतील बंद कॅबीनमध्ये उधळत होते प्रेमाचे रंग! मेहकर पोलिसांनी छापा टाकून घडविली अद्दल..

 
मेहकर(अनिल मंजुळकर : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) होय! अजूनही काही ठिकाणच्या कॅफेमध्ये इश्काचा खेळ चालतो. कॉफी आणि गॉसिफचा अड्डा म्हणून तरुण-तरुणी कॅफेमध्ये जातात. पण मैत्रीत बेधुंद होऊन असभ्य वर्तन करण्यापर्यंत त्यांची मजल जाते. विशेष म्हणजे, कॅफेमध्ये छोट्या छोट्या कॅबिन बनविण्यात आल्या आहेत. त्या कशासाठी? असा सवाल उपस्थित होतो. मेहकरमध्ये अश्याच एका कॅफेत धडक देवून चार तरुण तरुणींना चांगलाच धडा शिकवला. डोणगाव रोडवरील रहाटे कॉम्प्लेक्समधील एका कॅफेत पोलिसांनी २५ जूनच्या सायंकाळी छापेमारी केली. 
   मेहकर पोलिसांनी अचानकपणे दिलेल्या धडकेत उपस्थित सगळेच हादरले. त्यावेळी, चार तरुण मुले मुली बंद केबिनमध्ये असभ्य वर्तन करत असल्याचे उघड झाले. दरम्यान पोलिसांनी, फूड डिलिव्हरीचा परवाना आहे का? असे कॅफे चालकाला विचारले. त्याच्याजवळ परवाना नसल्याची गंभीर बाब यावेळी उघडकीस आली. शासन परवानगीचे उल्लंघन करीत असभ्य वर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना चांगलाच धडा शिकवला. कॅफे चालक पवन संतोष जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.