PM किसान सन्मान योजनेत जिवंत शेतकऱ्यांना मयत दाखवले! शेलोडीत काँग्रेस नेते राम डहाकेंनी तिरडी आंदोलन करून शासनाचे श्राद्ध घातले

 
Tfg
चिखली( गणेश धुंदळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): PM किसान सन्मान योजनेत जिवंत शेतकऱ्यांना मयत दाखवल्याचा प्रकार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी उघडकीस आणला होता. त्यानंतर सगळीकडे संतापाची लाट उसळली होती. दरम्यान आता प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राम डहाके यांनी सुद्धा याप्रकरणी शासनावर आसूड ओढले आहेत. ९ जुलैला तिरडी आंदोलन आणि शासनाचे श्राद्ध घालून त्यांनी या प्रकाराचा निषेध नोंदवला.
शासनाने मोठा गाजावाजा करून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली,मात्र या योजनेत चिखली तालुक्यातील अनेक जिवंत शेतकऱ्यांना मयत दाखवून अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित रहावे लागले. सरकारने अक्कल गहाण ठेवली आहे, केवळ सत्तेच्या खेळात ते व्यस्त आहेत, सरकारला सामान्यांच्या हिताची काळजी नाही असा घणाघात यावेळी राम डहाके यांनी केला. यावेळी शेलोडी येथील अरुण नेमाने, मधुकर दौलत नेमाने, मनोहर नारायण वाळसकर, अक्रम खासाब, रामधन मोरे, तुळशीदास नरवाडे, अरुण पन्हाळकर, तुळशीदास नेमाने, ज्ञानेश्वर नरवाडे, शिवाजी भिसे, रमेश मोरे, भगवान तावरे, विश्वंभर जाधव, विष्णू तावरे यांच्यासह शेलोडी गावातील शेतकरी उपस्थित होते.