जानेफळात ना. प्रतापराव जाधवांचा नागरी सत्कार! लाडकी बहिण योजने अर्ज भरण्याचे शिबीर पार पाडले; ना.प्रतापराव जाधव म्हणाले, ही योजना ऐतिहासिक...
Jul 8, 2024, 08:57 IST
मेहकर(अनिल मंजुळकर: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मंत्रीपद मिळाल्यानंतर केंद्रीय आयुष व आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव काल ७ जुलै रोजी पहिल्यांदाच जानेफळ नगरीत आले होते. दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी परिसरातील महिलांचे अर्ज भरण्याचे शिबिर शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. आ. संजय रायमुलकर यांच्या नियोजनातून हा कार्यक्रम पार पडला. यावेळी, जानेफळनगर वासियांनी ना. जाधव यांचा नागरी सत्कार केला.लाडकी बहीण योजना ऐतिहासिक आहे.केंद्रातले आणि राज्यातले सरकार महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देणारी आहे. नारीशक्ती सशक्त तर देश सशक्त म्हणून लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी ना.प्रतापराव जाधव यांनी केले.
जानेफळ येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत लाडकी बहीण योजनेचे मोफत अर्ज प्रक्रिया शिबिर पार पडले. परिसरातील गावांमधून देखील मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. २१ ते ६५ वयोगटातील महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले. सकाळी ८ वाजेपासूनच या ठिकाणी गर्दी जमली होती. वेगवेगळ्या गावांसाठी वेग वेगळे कक्ष तयार करण्यात आले. यामध्ये, त्या त्या गावातील अंगणवाडी सेविकांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरले. प्रारंभी ना. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, केंद्र आणि राज्यशासनाने महिलांना विविध योजना दिल्या आहेत. आर्थिक दृष्ट्या महिलांनी बळकट व्हावे असा या मागचा हेतू असून राज्यभरात मोठ्या संख्येने महिला योजनांचा लाभ घेत आहेत. सर्व घटकातील नागरिकांना उपयुक्त ठरेल असा अर्थसंकल्प काही दिवसांपूर्वीच जाहीर झाला. राज्य सरकार सर्व सामान्य जनतेच्या हिताचे विचार करणारे सरकार आहे. असे ते म्हणाले. याप्रसंगी मंचावर माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, प्रा. सचिन जाधव, शिवसेना उपतालुकाप्रमुख विश्वासराव सवडतकर, अशोक बोरकर, अशोक पसरटे, हिम्मत आवले, सचिन राजूरकर, कृष्ण हावरे, गजानन वडणकर, विजय कृपाळ, उमेश सदावर्ते, यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.