अंचरवाडीत उन्हाळी शिबिरात मुलांना मिळणार संस्काराची शिदोरी; स्वप्नपूर्ती स्कूल ॲन्ड जूनियर कॉलेज च्या वतीने आयोजित उन्हाळी शिबिराचे थाटात उद्घाटन;

उद्घाटक डॉ. गायत्री सावजी म्हणाल्या, मुलांना देशासाठी घडवण्याची गरज
 
अंचरवाडी (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देशासाठी मुलांना घडवण्याकडे पालकांचा कल असला पाहिजे.मुलांना घडवण्यासाठी त्यांना चांगल्या संगतीची आणि चांगल्या संस्कारांची गरज आहे. चांगल्या संस्कारासह आयुष्यात येणाऱ्या संकटांचा धैर्याने मुकाबला कसा करायचा याचेही प्रशिक्षण आपल्या पाल्यांना दिले पाहिजे. यासाठी उन्हाळी शिबिरे खूप उपयुक्त ठरतात. स्वप्नपूर्ती स्कूल ॲन्ड जूनियर कॉलेजच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी शिबिरातून शिबिरार्थी मुलांना संस्काराची शिदोरी मिळेल, त्या शिदोरीचा उपयोग मुलांना भविष्यात होईल असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गायत्री सावजी यांनी केले. अंचरवाडी येथील स्वप्नपूर्ती स्कूल ॲन्ड जूनियर कॉलेजच्या वतीने आयोजित उन्हाळी संस्कार शिबिराचे ९ मे रोजी उद्घाटन झाले, यावेळी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. संस्थेचे अध्यक्ष एकनाथ परिहार, सचिव समाधान परिहार, कोषाध्यक्ष रवींद्र परिहार यांच्यासह गावकरी, शिबिरार्थी मुलांचे  पालक व शिबिरार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        rthyg

पुढे बोलतांना गायत्रीताई सावजी म्हणाल्या की, ज्या गोष्टी आपण जाहीर सांगू शकतो त्या चांगल्या आणि  ज्या गोष्टी जाहीरपणे सांगू शकत नाहीत त्या वाईट हा चांगल्या वाईटाचा सरळ सोपा नियम मुलांनी ध्यानात घ्यावा. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर आवश्यक त्या चांगल्या कामांसाठीच करावा, मुलांच्या मोबाईल वापराकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या.

आयुष्यात माणसं जोडण्याला महत्व आहे, माणसं जोडता जोडता देश जोडल्या जातो हे त्यांनी एका कथेच्या माध्यमातून पटवून दिले.पालकांनी आपल्या मुलांशी संवाद वाढवावा, बाहेर काहीही झाले तर त्याला ते पालकांना सर्वात आधी सांगावे वाटले पाहिजे, यातून मुलांचे उत्तम संवाद कौशल्य वाढते. मुलांच्या आहाराकडे व आरोग्याकडे सुद्धा पालकांनी जागरूकतेने लक्ष देण्याची गरज असल्याचे गायत्री सावजी म्हणाल्या. प्रास्ताविकातून संस्थेचे सचिव समाधान परिहार यांनी संस्थेच्या आतापर्यंतच्या वाटचालीबद्दल सांगितले. उन्हाळी शिबिराच्या आयोजनाची भूमिका त्यांनी विषद केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान देखील करण्यात आला. सूत्रसंचालन सौ. गाताडे यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री. भुतेकर यांनी केले.