शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढील ५ दिवस कसे राहणार हवामान? बातमीत वाचा...तुरीवर अळीचा प्रादुर्भाव झालाय? मग हा करा उपाय....

 
Shenga
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):
ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक वार्ता आहे. जिल्ह्यात पुढील पाच दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे व काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. 
दरम्यान शेतकऱ्यांनी विविध कामे उरकून घ्यावी, बदलत्या हवामानामुळे झालेल्या पिकांवरील दुष्परिणामावर गुणकारक उपचार पद्धती करावी असे आवाहन जिल्हा हवामान केंद्र व कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
  महत्वाचा कृषी सल्ला...
 सध्याच्या हवामान परिस्थितीमुळे तुरीमध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. नियंत्रणासाठी फ्ल्युबेंडामाईड २०% डब्ल्यु. जी. या कीटकनाशकाची @५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बाकी असलेल्या बागायती गव्हाची ताबडतोब पेरणी उरकून घ्यावी. पेरणी करताना बियाणे ५-६ सेंमी. पेक्षा खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी.
हरभरा पिकामध्ये घाटे अळीचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी शेतात जागोजागी 'T' आकाराचे पक्षी थांबे उभारावे. तसेच पिकातील रोगग्रस्त झाडे उपटून टाकावी. कपाशीतील गुलाबी बोंड अळीचे खाद्यान्न बंद व्हावे म्हणून शेतकरी बंधूंनी कपाशीची फरदड घेऊ नये. शेवटच्या वेचणीनंतर झाडांचे अवशेष गोळा करून नष्ट करावेत.कांदा रोपे स्थलांतरित करण्यापुर्वी ती कार्बनडेंझीम (०.१%) च्या द्रावणात बुडवून लावावी. यामुळे बुरशीजन्य रोगाची लागण होण्यास प्रतिबंध होतो. हिवाळ्यात कमी होत असलेल्या तापमानामुळे दुधाळ जनावरांचे दुध उत्पादनात घट निर्माण करते. त्यासाठी जनावरांना प्रथिनयुक्त आहार द्यावा असा सल्ला जिल्हा कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने प्रसारित करण्यात आला आहे.