"वाट पाहते मी ग बाई, केव्हा येणार एसटी माझी?" जानेफळ - मेहकर रोडवर तासंतास एसटीची प्रतीक्षा; एसटीवरचे फलक पण गायब! प्रवासी कन्फ्युज...

 
मेहकर(अनिल मंजुळकर : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मेहकर जानेफळ रोडवरील बस थांब्यावर तासंतास एसटीची वाट पहावी लागते. इतर खाजगी वाहने देखील असतील, वाट पाहीन पण एसटीनेच जाईल! असा निश्चय महिलांचा आहे. अर्थातच याचे कारण म्हणजे राज्य सरकारने महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवेत ५० टक्के सूट दिली. असे असताना, महिलांची डोकेदुखी आणि होणारी दमछाक थांबली तरी कुठे? असा सवाल उपस्थित होत आहे.
 मेहकर जानेफळ रोडवरील एक बस थांबा आहे. त्या ठिकाणाहून प्रवास करण्यासाठी तासंतास एसटीची वाट पहावी लागते. इतकेच नाही, तर एसटी कधी निघून जाते याचा नेम महिलांना लागत नाही. इतक्या सुसाटाने गाड्या धावतात. प्राप्त माहितीनुसार, मेहकर आगारातील अनेक बसेसला फलकच नाहीत. त्यामुळे प्रवाशांचा वेगळा गोंधळ निर्माण होतो. गाडी कुठे चालली नेमके ते कळत नाही... चालक आणि वाहक कसेबसे चुन्याने काचावर लिहितात.. परंतु प्रवासी गोंधळतात. कित्येकदा तर रिकाम्या बसेस धावत असल्याचे प्रवासी सांगतात. दरम्यान, मेहकर रोडवरील विविध गावांनी बस सेवा सुरळीत करण्याची मागणी केली. प्रवाशांना सोयीचे ठरावे अशा बस फेऱ्या सोडाव्या, चांगली वागणूक मिळावी अशा विविध मागण्या होत आहे.