पुलाचे काम सुरू करायचेच नव्हते तर खोदून कशाला ठेवले रे बाबा?

निर्ढावलेल्या ठेकेदाराला नागरिकांचा सवाल! दोन महिन्यांपासून पुल खोदून ठेवला; देऊळगाव घुबे वरून कोनड, अमोना , वरूडला जायचे कसे.?

 
road
देऊळगाव घुबे(ऋषी भोपळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथून कोनड, अमोना,  या गावांना जाणाऱ्या तसेच विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुल ठेकेदाराने दोन महिन्यांपासून खोदून ठेवलाय. अद्याप कामाला सुरुवात केली नाही, पुल खोदून ठेवल्याने तिथे पाण्याचे डबके साचलेय..मात्र पर्यायी रस्ता नसल्याने वाहनधारकांना त्याच डबक्यातून आपले वाहन काढावे लागतेय. 
 

सार्वजनिक बांधकाम विभागाने पुल निर्माण करण्याचा ठेका ज्या ठेकेदाराला दिलाय त्या ठेकेदाराने हा कारनामा केलाय. पुलाचे काम सुरू करायचेच नव्हते तर खोदून कशाला ठेवले रे बाबा? असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून विचारल्या जातोय. विदर्भ मराठवाड्याला जोडणारा हा रस्ता मेहकर साखरखेर्डा या भागातील नागरिकांसाठी अतिशय जवळचा आणि सोपा रस्ता आहे. मराठवाड्यातील जाफ्राबाद तालुक्यातील वरूड हे गाव येथून अवघे १० किमी आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ असते. मात्र रस्त्यावरील पुल खोदून ठेवत पर्यायी रस्ता न बनवल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. सध्या उन्हाळा असला तरी पाटाला पाणी सुटलेले असल्याने, रस्त्यावरील त्या ओढ्याला देखील पाणी असते त्यामुळे साचलेल्या पाण्याच्या डोहातून जीव मुठीत घेऊन वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे, छोटे मोठे अपघात देखील त्यामुळे झालेत. देऊळगाव घुबे येथील काही नागरिकांनी फोनवर ठेकेदाराला यासंदर्भात जाब विचारला मात्र ठेकेदाराने उद्धटपणे उत्तर दिल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे पुलाचे काम तात्काळ सुरू करण्यासोबतच निर्ढावलेल्या ठेकेदारावर सुद्धा संबंधित विभागाने कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.