बुलडाणा जिल्हा पोलिसात भरती व्हायचंय ! तर ही बातमी तुमच्यासाठी, भरती कधी? काय प्रोसेस? सगळं वाचा..
Jun 18, 2024, 08:20 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) पोलिसात भरती होण्याचे स्वप्न बाळगून मैदानात सरावासाठी आणि अभ्यासिकेत अभ्यासासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. निवडणुकीमुळे तूर्त स्थगित झालेली भरती प्रक्रिया उद्या १९जून पासून सुरू होणार आहे. जिल्हा पोलीस दलात रिक्त असलेल्या १३३ जागांमधील विविध पदांसाठी ही भरती होत आहे. यासाठी जिल्ह्यातील १० हजार २३६ उमेदवारांनी अर्ज केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासणे यांनी दिली.
एकूण १३३ जागेचा सविस्तर तपशील असा की, यामध्ये १२५ पोलीस शिपाई, ४२ महिला पोलीस शिपाई, ८ बँड्समन आणि २ बँड्समन महिला अशा रिक्त पदांसाठी ही भरती होत आहे. सन २०२२ -२३ या वर्षांतील रिक्त शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सर्वत्र सुरू झाली आहे. पोलीस बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांना मैदानी आणि लेखी परीक्षा पार करावी लागेल. प्रथम ५० गुणांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. यामधून ५० टक्के गुण मिळणारे उमेदवाराकडून संबंधित प्रवर्गातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या १०० गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. दरम्यान, एकाच दिवशी दोन जिल्ह्यातील भरतीसाठी अर्ज असल्यास, उमेदवाराला बुलढाण्यात ३ जून नंतर भरती परीक्षा देता येणार आहे.
जिल्हा पोलीस दल सज्ज! सुरक्षितता आणि विद्यार्थ्यांची व्यवस्था असणार अशी..
उद्यापासून सुरू होत असलेल्या भरती प्रक्रियेसाठी जिल्हा पोलीस दलाची यंत्रणा सज्ज झाली आहे. दरम्यान, मैदानी चाचणीमध्ये विद्यार्थ्यांला शारीरिक अडचण उद्भवल्यास डॉक्टरांसह, रुग्णवाहिका तैनात राहणार आहे. भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे पूर्ण व्हावी, यासाठी जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. व्हिडिओ शूटिंगच्या खाली सगळी प्रक्रिया संपन्न होणार आहे. इतर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी राहण्याची व्यवस्था देखील पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली आहे. राहण्याचे ठिकाण भरतीच्याच दिवशी कळविण्यात येईल.
विद्यार्थ्यांनो पहाटे ५ वाजताच व्हा हजर!
अर्ज केल्यानंतर दिलेल्या वेळापत्रकानुसार सकाळी ५ वाजताच विद्यार्थ्यां पोलीस कवायत मैदानाजवळ हजर राहिले तर पुढील प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी सोयीची होईल. कागदपत्रांची पडताळणी शारीरिक चाचणी वेळेच्या आत पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सतर्क रहावे. अन्यथा आपल्या ध्येयापासून वंचित रहावे लागेल. त्यानंतर देऊळघाट रोडवर एका बाजूने विद्यार्थ्यांची धाव चाचणी होणार आहे.