रात्रीला चिखलीवरून पुण्याला,नागपूरला शिर्डीला जायचंय.. जाऊ कसं? होत्या त्या गाड्याही बंद केल्या...! जीव धोक्यात घालून ट्रॅव्हल्सने गेल्याशिवाय पर्याय नाही! प्रवाशी म्हणतात...

 
Gvbb
चिखली(गणेश धुंदळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): १ जुलैच्या तारखेत मध्यरात्री दिडला समृध्दी महामार्गावर भीषण अपघात झाला. खासगी ट्रॅव्हल्स लागल्याने २५ जणांचा जळून कोळसा झाला. अपघात एवढा भीषण होता की कोणता मृतदेह कोणाचा हेही कळत नव्हतं. ज्यांनी ज्यांनी अपघातस्थळी भेट दिली किंवा अपघाताचे फोटो बघितले त्यांच्या काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहला नाही. दरम्यान या अपघातानंतर खासगी ट्रॅव्हल्स ऐवजी आपली एसटी बस परवडली बा..अशा भावना प्रवाशी व्यक्त करत आहेत. मात्र असे असले तरी चिखली आगारातून लांब पल्ल्याच्या आधी सुरू असलेल्या गाड्या आता अलीकडच्या काळात बंद आहेत. रात्रीच्या वेळेस पुण्याला, शिर्डीला, सुरतला जाण्यासाठी आधी चिखली आगारातून गाड्या होत्या मात्र आता त्या बंद असल्याने प्रवाशांची हेळसांड होत आहे. नाईलाजाने का होईना प्रवाशांना खाजगी ट्रॅव्हल्सचा उपयोग करावा लागत आहे.
प्राप्त माहितीनुसार सध्या चिखली आगारातून चिखली सूरत गाडी बंद करण्यात आलेली आहे.तर दुसरीकडे चिखलीवरून सुरुरतला जाणाऱ्या ६ खाजगी बसेस आहेत. चिखली सारख्या प्रमुख आणि वर्दळीच्या शहरातून पुण्याला जाण्यासाठी केवळ ३ बसेस आहेत, त्यापैकी सकाळी ७, दुसरी दुपारी १२ आणि तिसरी संध्याकाळी साडेसहाला सुटते. चिखलीवरून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसेस मात्र मोठ्या संख्येत आहेत, विशेष म्हणजे जवळपास सगळ्या खासगी बसेस भरगच्च असतात,त्यामुळे आणखी एक किंवा दोन गाड्या पुण्याला जाण्यासाठी एसटी प्रशासनाने सोडाव्यात अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. नागपूरला जाण्यासाठी रात्रीच्या वेळेला एकही बस चिखली आगारातून उपलब्ध नाही. दुसऱ्या शहरातून येणाऱ्या गाड्या आधीच भरलेल्या असतात. त्यामुळे जीव मुठीत धरून प्रवाशांना प्रवास करावा लागतो.दुसरीकडे शिर्डी, सुरत, नागपूर, मुंबई या शहरात जाणाऱ्या गाड्या देखील पूर्ववत सुरू करण्याची मागणी होत आहे. शिक्षणासाठी , नोकरीसाठी व इतर कामांसाठी या शहरात चिखलीवरून जाणाऱ्यांची संख्या मोठ्या आहे त्याचा विचार एसटी प्रशासनाने करण्याची गरज आहे.