लग्नात काढायचा फोटो अन् म्हणे मी बॉलिवूडचा फोटोग्राफर!; मॉडेलकडून आधी घेतले बोल्ड फोटो, नंतर केली शारीरिक सुखाची मागणी!!

 
model
मुंबई : छोटे- मोठे कार्यक्रम, लग्नसोहळ्यांत फोटो काढणाऱ्या एका फोटोग्राफरचा विचित्र कारनामा समोर आला आहे. मॉडेलला बॉलिवूडमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिच्याकडून त्याने बोल्ड फोटो मागितले आणि शारीरिक सुखाची मागणी केली. मॉडेलने शारीरिक सुखाच्या मागणीला नकार दिल्यावर त्याने ते फोटो व्हायरल केले. याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी ओंकार ऊर्फ ओमप्रकाश राजू तिवारी (२३) नावाच्या एका फोटोग्राफरला अटक केली आहे. ओंकार स्वतःची ओळख कास्टिंग डायरेक्टर व एका मोठ्या प्रोडक्शन हाऊसशी संलग्न फोटोग्राफर म्हणून देत होता.

मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार इंटरनेटवरून टॉप मॉडेल्स आणि अभिनेत्यांचे फोटो चोरायचा. हे फोटो मीच काढले असा दावा करत ते स्वतःच्या सोशल मीडिया पेजवर अपलोड करायचा. याच माध्यमातून अनेक इच्छुक मॉडेल्स त्याच्याशी संपर्क साधत होत्या. बंगालच्या एका २२ वर्षीय तरुणीने त्याच्याशी संपर्क साधला. चित्रपटात करिअर करण्यासाठी ती मुंबईत आली होती. ओंकारच्या प्रोफाइलने ती प्रभावित झाली. त्याच्याशी ऑनलाइन संपर्क साधला. तेव्हा ओंकारने तिला प्रोडक्शन हाऊसमध्ये काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

तिला तिचे काही बोल्ड फोटोसुद्धा पाठवायला सांगितले. तरुणीने फोटो पाठवल्यानंतर ते फोटो व्हायरल करेल, अशी धमकी त्याने दिली व तिच्याकडे तो शारीरिक सुखाची मागणी करू लागला. तरुणीने जेव्हा मागणीला नकार दिला. तेव्हा त्याने फोटो व्हायरल केले. तरुणीला याबद्दल माहिती झाल्यावर तिने ८ जानेवारी रोजी मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून ओंकारविरुद्ध गुन्हा दाखल केला. ओंकार स्थानिक पातळीवर लग्न आणि छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये फोटोग्राफर म्हणून काम करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले.