मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ बुलडाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात! चिखलीतही एक दिवसीय लाक्षणिक उपोषण! मागे न हटन्याचा निर्धार ...
Nov 1, 2023, 14:19 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात चांगलाच गाजतोय. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत. या आंदोलनाला राज्यभरात समर्थन मिळत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातही या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे.
बुलडाणा जिल्ह्यात खामगाव, मलकापूर, चिखली, सिंदखेडराजा येथे मराठा समाजबांधव उपोषणाला बसलेले आहेत. काल खामगावात मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला काळे फासण्यात आले. सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी, ताडशिवणी गावात पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आलेली आहे. दरम्यान आज बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या बांधवांनी उपोषणाला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून उपोषणाला सुरुवात झाली. आरक्षण मिळेपर्यंत मागे न हटन्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.चिखलीत देखील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसले आहेत.