अरेच्चा! लाच देणारा व्यापारी अडकला एसीबीच्या जाळ्यात! टॅक्स कमी करण्यासाठी सहाय्यक राज्य कर आयुक्तांच्या टेबलावर ठेवले ३ लाख! मलकापूरच्या व्यापाऱ्यावर खामगावात कारवाई...
Updated: Dec 21, 2023, 11:33 IST
खामगाव(बुलडाणा लाव्ह वृत्तसेवा) : कंपनीचा टॅक्स कमी करून फायनल ऑर्डर नील मिळावी त्यासाठी मलकापूरच्या दालमिल कंपनीच्या व्यापाऱ्याने खामगांव येथे कर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांच्या टेबलवर चक्क ३ लाख रुपये टेकवले. या घटनेने सर्वत्र व्यापारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मलकापूरच्या व्यापाऱ्याने प्रामाणिक अधिकाऱ्याला लाच घेण्यासाठी प्रवृत्त केले. मात्र अधिकाऱ्याने एसीबी कडे तक्रार दिली. त्यानंतर मलकापूरच्या दाल मिल कंपनीच्या व्यापाऱ्यावर सापळा रचून कारवाई करण्यात आली. काल २० डिसेंबर रोजी खामगाव येथील जीएसटी कार्यालयात जालना अँटी करप्शन ब्युरो ने व्यापारी आरोपीला लाच देतांना रंगेहाथ पकडले. आरोपी व्यापाऱ्याचे नाव प्रवीण मदनलाल अग्रवाल असे आहे. त्याच्या कंपनीचे नाव बजरंग इंडस्ट्रीज असे आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मलकापूर येथील दाल मिल कंपनीचे सन २०१७ -२०१८ वर्षातील टॅक्स २कोटी ७७ लाख पर्यंत थकलेला आहे. त्यामुळे २४ जून २०२२ रोजी कर विभागाने व्यापाऱ्याला प्रथम नोटीस दिली. त्यानंतर देखील वारंवार नोटीस देऊन कंपनीच्या मालकाने थकबाकी न भरल्यामुळे डिसेंबर २०२३ मध्ये मालमत्ता जप्तीचे ऑर्डर काढण्यात येईल असे कर विभागाने कळविले. मात्र टॅक्स कमी करून फायनल ऑर्डर नील मिळण्यासाठी मलकापूरच्या बहाद्दर व्यापाऱ्यांनी तीन लाख रुपये देतो असे म्हणून सहायक्क कर आयुक्त यांना लाच घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला.
मात्र तक्रारदार लाच घेण्याच्या मानसिकतेत नव्हते. त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संबंधित व्यापाऱ्याची तक्रार दिली. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे व्यापाऱ्याचा अति हुशारपणा समोर आला. दरम्यान जालना अँटी करप्शन ब्युरो ने सापळा रचून खामगाव कर विभागात काल कारवाई केली. व्यापाऱ्यावर खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई जालना अँटी करप्शन ब्युरो चे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपाधीक्षक किरण बिडवे, हेड कॉन्स्टेबल गजानन घायवट, शिवाजी जमधडे, कॉन्स्टेबल गणेश भुजाडे, गणेश चेके यांनी केली आहे.