माहेरवरून सासरी जात होती; मोटारसायकलला रोही धडकला, विवाहितेचा मृत्यू! भाऊ गंभीर जखमी! मलगी - देऊळगाव घुबे रस्त्यावर झाला अपघात! पित्तर जेवणासाठी गेले होते माहेरी...

 
Bnd
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): माहेरवरून सासरी जात असताना दुचाकीला रोह्याने धडक दिल्याने विवाहितेचा जागीच मृत्यू झाला. चिखली तालुक्यातील मलगी - देऊळगावघुबे रस्त्यावर काल,३ ऑक्टोबरच्या सायंकाळी हा अपघात झाला. आश्र्विनी ज्ञानेश्वर जाधव(२२,रा.मलगी,ता.चिखली) असे अपघातात ठार झालेल्या विवाहितेचे नाव असून याच अपघातात बहिणीला सासरी सोडायला निघालेला विवाहितेचा नात्यातील भाऊ गणेश भुसारी (रा.अमोना)हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
  प्राप्त माहितीनुसार आश्विनीचे दोन वर्षाआधीच लग्न झालेले आहे. माहेरी अमोना येथे आलेली आश्विनी काल, संध्याकाळी सासरी जाण्यासाठी निघाली होती. नात्यातील भाऊ गणेश भुसारी हा बहिणीला सोडण्यासाठी दुचाकीने जात होता. दरम्यान घरून निघाल्यानंतर सासर अवघ्या २ -३ मिनिटांच्या आले असताना काळोना फाट्याजवळ रोह्यांचा एक कळप रस्त्यात आडवा आला. 
   कळपातील एका रोह्याने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरून खाली पडल्याने आश्विनीच्या डोक्याला जबर मार लागला. यात तिचा जागीच मृत्यू झाला तर भाऊ गणेश भुसारी हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रात्री शोकाकुल वातावरणात विवाहितेवर सासरी मलगी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
   
पित्तर जेवण्यासाठी पती-पत्नी गेले होते; पती आधी निघून आला..
  आश्विनी आणि तिचे पती ज्ञानेश्वर जाधव हे पित्तर जेवण्यासाठी अमोना येथे गेले होते. मात्र ज्ञानेश्वर जाधव यांना काम असल्याने ते जेवणानंतर मलगी येथे निघून आले व पत्नीला नंतर यायला सांगितले. दरम्यान काल, सायंकाळी नात्यातील भावासोबत दुचाकीने मलगी येथे येत असताना हा अपघात झाला..