रोह्यांपासून पीक राखायला गेला, सापाने घेतला शेतकऱ्याचा चावा! चिखली तालुक्यातील इसोलीची घटना; वनविभागाने लक्ष घालण्याची गरज. .

 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)चिखली तालुक्यातील इसोली शेत शिवारात रोही व अन्य वन्य प्राण्यांचा धुमाकूळ सुरू आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच ठिकाणी पेरणीची कामे आटोपली आहे. आता शेतातील पिकाचे संरक्षण करण्यासाठी रात्री बेरात्री, पाण्या पावसाची पर्वा न करता शेतकरी पिकाच्या देखरेखीसाठी शेतात जातात. यामध्येच, शेत शिवारात धुमाकूळ घालत असलेल्या रोह्यांना हाकलून लावण्यासाठी गेलेल्या इसोलीच्या शेतकऱ्याला सर्पदंश झाल्याची घटना काल ३ जुलै रोजी रात्री उशिरा घडली. सध्या त्या शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. 
दीपक मधुकर वाकळे असे सर्पदंश झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. वाकळे यांचे इसोली शिवारात तीन एक्कर शेती आहे. रात्री रोही, हरीण, डुक्कर असे वन्यप्राणी धुमाकुळ घालतात. यामुळे वाकळे रात्री शेतातील रोह्यांना हाकलून लावण्यासाठी गेले. पण जे व्हायचे नाही तेच होवून गेले. रात्री ११:३० वाजेच्या सुमारास त्यांना शेतातील एका विषारी सापाने चावा घेतला. या घटनेमुळे वाकळे यांची प्रकृती ढासळली आहे. चिखली येथील खंडागळे हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. सध्या त्यांचे प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. यापूर्वी रोह्यांमुळे इकडून शेतकऱ्यांसोबत विपरीत घटना घडून गेल्याचे विविध घटनांमधून दिसून आले आहे.
वनविभागाने लक्ष द्यावे: गोविंद येवले
  दरम्यान सदर घटना अतिशय चिंताजनक आहे. वन्य प्राण्यांचे आहे दिवसांवर शेतकरी परेशान आहे. रात्री या रात्री शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. अशा शेतकऱ्यांच्या जीवाचे बरे-वाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल वन बुलडाणा मिशनचे जिल्हा संघटक गोविंद येवले यांनी केला आहे. इसोली येथील दिपक वाकळे यांच्या उपचाराचा खर्च वनविभागाने केला पाहिजे तसेच रोह्यांचा बंदोबस्त तातडीने करावे अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील असा इशाराही येवले यांनी दिला.