Amazon Ad

BREAKING लाकडी दांड्याने वार करत वहिनीचा घेतला जीव! भादोल्याची घटना; दिराला न्यायालयाचा दणका...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) वहिनीने चोरीचा आरोप केला म्हणून तिच्या डोक्यात लाकडी दांड्याने मारहाण केली. उपचारादरम्यान तिचा छत्रपती संभाजीनगर येथे मृत्यू झाला. २८ डिसेंबर २०२० रोजी ही घटना घडली होती. त्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट होते. आज २५ जून २०२४ रोजी आरोपी दिर राजू गवई याला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री स्वप्निल खटी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 
  सविस्तर घटनाक्रम असा की, भादोला येथील रहिवासी संतोष चिंकाजी गवई यांच्या पत्नीने दिर राजू गवई याच्या विरोधात चोरीचा आरोप केला. त्यामुळे राजू हा चांगलाच संतापला. यामुळे राजूने वहिनी बेबीबाई यांच्या डोक्यावर लाकडी दांड्याने मारहाण केली. डोक्यात जबर मार लागल्याने बेबीबाई यांच्या डोक्यातुन रक्तस्त्राव सुरू झाला. त्यावेळी संदीप गवई हा तिथे पोहोचला. संदीपने विचारल्यानंतर राजूने मारहाण केल्याचे बेबीबाई म्हणाल्या. त्यांनतर बेबीबाई गवई यांना बुलढाणा येथील सरकारी दवाखान्यात भरती करण्यात आले. असे तक्रारीत म्हटले होते. २७ डिसेंबर रोजी ही तक्रार देण्यात आली होती. राजू गवई याच्या विरोधात ३०७ कलमेनुसार गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या बेबीबाई यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, २८ डिसेंबर रोजी त्यांचा उपचारा दरम्यानच मृत्यू झाला. त्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये कलम ३०२ व कलम ४५२ समाविष्ट केल्या गेल्या.. सदर गुन्हयाचा तपास सर्वप्रथम पोलीस उपनिरीक्षक रामपुरे, तसेच निरीक्षक नवलकार त्यानंतर 
उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी केला. आरोपीविरूध्द भरपूर पुरावा मिळून आल्याने बुलढाणा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. सदरचे प्रकरण हे विशेष सरकारी वकील ॲड. संतोष खत्री यांचेकडे सरकार पक्षाची बाजू मांडण्याकरीता सोपविण्यात आले. प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी साक्षीदार संदिप गवई यांचा पुरावा महत्वाचा ठरला. कारण बैबीबाई हिने मृत्यूआधी राजुने मारल्याचे साक्षीदार संदीप गवई यांना सांगीतले होते. त्यामुळे साक्षीदार संदिप गवई यांचा पुरावा विशेष ठरला. त्याप्रमाणे इतर परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे सरकारी वकील ॲड. संतोष खत्री यांनी प्रखरपणे युक्तिवाद केला. परंतु मृतक बेबीबाई ह्या घराच्या टीणावरून लाकडे काढत असताना पडल्या आणि डोक्याला मार लागून त्या मरण पावल्या असा युक्तिवाद आरोपीच्या विधिज्ञांनी केला होता. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री स्वप्निल खटी यांनी कलम ३१० सी. आर. पी. सी नुसार घटनास्थळाचे अवलोकन करण्याकरीता आदेश पारीत केले. व त्यानुसार सरकारी वकील तसेच आरोपींचे वकिलांना नोटीस देवुन प्रत्यक्षरीत्या घटनास्थळाचे अवलोकन केले. आतापर्यंतच्या न्यायालय इतिहासात बुलढाण्यात हे प्रथमच घडले होते. दस्तरखुद्द न्यायाधीशांच्या अवलोकनानंतर आरोपीचा बचाव योग्य नसल्याचे न्यायनिर्णयात नमूद केले. आरोपी राजू गवई याच्या विरोधात गुन्हा सिद्ध होत असल्याने कलम ३०२ भा.दं.वि. मध्ये आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा व रू. ५०० दंड ठोठावला. दंड न भरल्यास २ वर्षापर्यंत सश्रम कारावासची शिक्षा ठोठावली. तसेच कलम ४५२ भा.दं.वि. मध्ये ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व रू. ५०० दंड ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिन्यांपर्यंत सश्रम कारावासची शिक्षा ठोठावली. सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. संतोष खत्री यांनी कामकाज पाहिले. बुलडाणा ग्रामीण पोलिसांमधील हेड कॉन्स्टेबल बोरकर, झगरे, मिसाळ यांनी सहकार्य केले.