पोटचा मुलगा गमावला;पण तीन बालकांना दिले जीवनदान! हृदयासह किडनीचे दान! शाळेतून घरी जातांना झाला होता अमोना येथील शिवहरी चा अपघात...वाचा काळीज हेलावणारी गोष्ट...

 
Heart
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना मागून आलेल्या एका मालवाहू वाहनाने त्याला धडक दिली..गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने चिमुकल्याला वाचवण्यासाठी त्याला उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले..तिथे डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून आई वडिलांवर आभाळच कोसळलं... मुलाचा ब्रेन डेड झाल्याचे समजल्यावर नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला..मात्र याही कठीण समई डॉक्टरांनी अवयवदानाबद्दल माहिती दिल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता चिमुकल्याच्या आई वडिलांनी मुलाच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. हृदयासह किडनी दान केल्याने अवयवांची नितांत आवश्यकता असलेल्या ३ बालकांना जीवनदान मिळाले..ही गोष्ट आहे चिखली तालुक्यातील अमोना येथील शिवहरी अनंता राजपूत या चिमुकल्याची..त्याच्यावर ८ जानेवारीला अमोना येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले..
  Add
                         जाहिरात 👆
राजपूत कुटुंब मूळचे चिखली तालुक्यातील अमोना गावचे.. अनंता राजपूत हे गेल्या ७ वर्षांपासून मजुरीकामासाठी सातारा जिल्ह्यातील घटाव तालुक्यातील डीसकळ गावात राहतात. ४ जानेवारीचा दिवस राजपूत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळणारा ठरला. पाचव्या वर्गात शिकणारा मोठा मुलगा शिवहरी (११) याचा सायंकाळी शाळेतून घरी येत असताना भीषण अपघात झाला. पाठीमागून येणाऱ्या एका वाहनाने रस्त्याच्या डाव्या बाजूने शिस्तीत घरी जाणाऱ्या शिवहरीला उडवले. त्याला तातडीने आधी गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र त्यानंतर तिथून साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. मात्र शिवहरी ची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.
   ५ जानेवारीच्या रात्री शिवहरी ला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथल्या डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र जास्त मार लागलेला असल्याने उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर ७ जानेवारीला डॉक्टरांनी शिवहरी ला ब्रेन डेड झाल्याचे घोषित केले. यावेळी त्याची कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला..डोळ्यासमोर आता फक्त अंधारच होता...
  तीन बालकांना दिले जीवनदान
ब्रेन डेड झाल्यानंतर अवयवदानाची माहिती डॉक्टरांनी सांगितली. आपल्या आयुष्यात अंधार झाला म्हणून काय झाले आपण कुणाच्यातरी आयुष्यात उजेड पसरवू शकतो याची खात्री झाल्यानंतर शिवहरी च्या आईवडिलांनी अवयवदान करण्याची परवानगी दिली. त्यानंतर शिवहरी चे हृदय पिंपरीतील डी. वाय.पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल मधील एका बालकाला, एक किडनी वानवडी येथील कमांड हॉस्पिटल मधील बालकाला तर दुसरी किडनी सिम्बॉयसिस हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेल्या एका बालकाला देण्यात आली. आता त्या तिघांचीही प्रकृती स्थिर आहे..