सकाळी चढला, संध्याकाळी उतरला! धनगर आरक्षणासाठी पुन्हा एक कार्यकर्ता 'बीएसएनएल टॉवर वर..!

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मागील ११ दिवसांपासून धनगर समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे संतप्त झालेला एक कार्यकर्ता नजीकच्या भारतीय दूरसंचार निगम च्या मनोऱ्यावर चढला...यामुळे प्रशासन व पोलिसांची एकच तारांबळ उडाली.

 सिद्धू नरोटे असे आंदोलनकर्त्याचे नाव असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. जिल्हा कचेरीसमोर युवा नेते नंदू लवंगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मागील २९ जानेवरीपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे शासन , प्रशासन यांचे दुर्लक्ष होत असल्याचा समाज बांधवांचा आरोप आहे. यामुळे संतप्त झालेल्या नरोटे याने आज सकाळी सात वाजताच्या आसपास थेट जिल्हाधिकारी कार्यालयाला लागून असलेले दूरसंचार कार्यालय गाठले!. यानंतर तो मागील बाजूला असलेल्या 'टॉवर' वर चढला. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत खाली उतरणार नाही, असा पवित्रा त्याने घेतला होता. दरम्यान प्रशासन, समाज बांधव, सामाजिक कार्यकर्ते यांनी समजूत घातल्यावर नरोटे संध्याकाळी खाली उतरला.