राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेतून शाहू महाराजांना जयंतीदिनी अभिवादन! संदीपदादा शेळके यांचे आयोजन! सहभागी होण्याचे आवाहन

 
SHAHU MAHARAJ

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त २६ जून रोजी राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. राजर्षी शाहू मल्टिस्टेट आणि राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशनच्यावतीने ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामाध्यमातून छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्यात येणार आहे.

राजर्षी शाहू महाराजांनी लोककल्याणाचे कार्य केले. राजा असून ऋषीसारखे जीवन छत्रपती शाहू महाराज जगले. त्यांना जनतेच्या हिताचा ध्यास होता. गोरगरीब, तळागाळातील घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. अनेक विकासात्मक योजना राबवल्या. त्यांच्या कार्याला इतिहासात तोड नाही. छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.  

निबंध स्पर्धेसाठी चार गट ठेवण्यात आले असून प्रत्येक गटासाठी वेगवेगळा विषय असणार आहे. अ गट पहिली ते पाचवीसाठी असून त्यांना लोकराजा राजर्षी शाहू महाराज हा विषय देण्यात आला आहे. ब गट सहावी ते आठवीसाठी असून या गटाला राजर्षी शाहू महाराज आणि त्यांचे शैक्षणिक कार्य या विषयावर निबंध लिहायचा आहे. क गटात आठवी ते बारावीचा समावेश असून सामाजिक सुधारणांचे अग्रदूत लोकराजा राजर्षी शाहू महाराज हा विषय ठेवण्यात आला आहे. तर ड गट हा खुला असून त्यांना महाराष्ट्रात शेती, उद्योग आणि सहकाराला चालना देणारे लोकराजे राजर्षी हा विषय देण्यात आला आहे.

असा नोंदवा सहभाग

निबंध स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. स्पर्धकांनी मराठीत निबंध लिहायचा आहे. टाईप केलेला मजकूर स्वीकारल्या जाणार नाही. सुंदर, सुटसुटीत हस्ताक्षरात निबंध लिहून  अपलोड करायचा आहे. स्पर्धेच्या दिवशी म्हणजे २६ जून रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लिंक सुरु राहणार आहे. दिलेल्या लिंकवर स्पर्धकांना सर्व मार्गदर्शक सूचना   उपलब्ध असणार आहेत. स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी ९३५९९४१८५३ या कॉल सेंटर आणि ९५२८४९०४९० या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा.

अशी आहेत बक्षिसे

प्रत्येक गटासाठी रोख स्वरुपात तीन बक्षिसे आणि पाच प्रोत्साहनपर बक्षिसे ठेवलेली आहेत. प्रथम बक्षीस पाच हजार, द्वितीय तीन हजार, तृतीय दोन हजार आणि प्रोत्साहनपर पाच बक्षिसे ठेवलेली आहेत. स्पर्धकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके, राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या अध्यक्षा मालतीताई शेळके यांनी केले आहे.