शेतकऱ्यांसाठी अतिमहत्वाची बातमी! शेतकऱ्यांनी विशिष्ट बियाणे, खताचा आग्रह धरू नये!कृषि विभागाचे आवाहन; कपाशी लागवड "या" तारखेनंतरच करा! बियाणे खरेदी करतांना काय काळजी घ्यायची? वाचा...

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी खरीप हगांमाच्या तयारीला लागलेला असून शेतीची मशागत करण्यात येत आहे. येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी विशिष्ट बियाणे वाण आणि रासायनिक खताचा आग्रह धरू नये, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

जिल्ह्यात कपाशी आणि सोयाबीन मुख्य पिके आहेत. या पिकाचे उत्पन्न हे जमिनीचा पोत, पाऊसमान, योग्य वेळी केलेली मशागत यावर अवलंबून आहे. पिकाच्या योग्य वेळेत झालेला पाऊस, जमिनीचा उत्तम पोत आणि वेळीच केलेल्या मशागतीमुळे भरगोस उत्पन्न मिळते.

सोयाबीन पिकात स्वपंरागीकरण होत असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्याची दरवर्षी बाजारातून नवीन वाण खरेदी करण्याची आवश्यकता नाही. एकदा खरेदी केलेल्या बियाण्याचे योग्य प्रकारे संवर्धन केल्यास सदर बियाणे तीन वर्षापर्यत वापरल्यास बियाण्यावरील खर्च कमी होतो. तरीही काही भागातील शेतकरी विशिष्ट कापूस आणि सोयाबीन बियाणे वाणाची मागणी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाण्यामध्ये सर्वच वाण हे उत्कृष्ट दर्जाचे असून भरपूर उत्पन्न देणारे आहेत. कपाशीतील सर्व वाणाचे बिटी जैव तंत्रज्ञान एकच असून सर्वाची उत्पादन क्षमता जवळपास सारखीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकाच वाणाचा आग्रह धरू नये.

घरच्या सोयाबीन बियाण्याची योग्य चाळणी आणि बिजप्रक्रिया करून घरच्या घरी उगवणशक्ती तपासून १०० मिली पाऊस पडल्यानंतर २ ते ३ सेंमी खोलीत बियाण्याची पेरणी केल्यास पिक उगवणीबाबत तक्रार राहणार नाही. कुठलेही बियाणे खरेदी करताना पक्के बिल घ्यावे. लेबल वरील लॉट नंबर आणि बिलातील लॉट नंबर पडताळून पाहावे. गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी कपाशी पिकाची लागवड १ जून नंतरच करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.